मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कुटुंबातील प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहेत. नवीन तरुण कार्यकर्त्यांना कटू आणि कठोर शब्दात सूचना केल्या जातात. शरद पवारांनी त्यातूनच मत मांडले असेल. यावरुन इतरांच्या जीवाची लगेच घालमेल होण्याचं काही कारण नाही. त्यांनी चिंता करु नये. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, त्यांनाच पाहू द्या, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी पार्थवरून असलेल्या पवार कुटुंबातील चर्चेवर दिली.
दुसऱ्या पक्षातील प्रमुख लोकांना सल्ला देण्याचे काम माझे नाही. 'सामना' एक वृत्तपत्र आहे. आजूबाजूला ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यावर भाष्य करायचे काम मी करत असतो. काल एक प्रकार घडला. तो मीडियाने घडवला, याच्यापलिकडे त्याला महत्त्व नाही. मी संपादकीयमध्ये हेच लिहिले आहे की, एखादा पक्ष एक कुटुंब असतो. जसे बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष चालवला, तसेच शरद पवार पक्ष चालवत आहेत. मुलायसिंह यादव हे एक उदाहरण झाले. हे सर्व कुटुंबं आहेत. त्या कुटुंबाच्या प्रमुखाने तरुण कार्यकर्त्यांविषयी एखादे मत व्यक्त केले तर आमच्यासारख्या लोकांनी ते मत आशिर्वाद म्हणून स्वीकारले असल्याचे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे देखील आम्हाला जाहीरपणे फटकारायचे. आम्ही त्यातूनच शिकत गेलो. पार्थ पवार नाराज आहेत की नाही हे तुम्ही आम्ही कोण ठरवणार? हे त्यांचे घरातील आई वडील ठरवतील. त्यांचे आजोबा ठरवतील. त्यांच्या पक्षाचे लोक ठरवतील. पार्थ पवार यांनी अगदी सुरुवातीला काही मागणी केली असती तर ते समजू शकलो असतो. मात्र, दोन महिन्यांनी त्यांच्या पत्राचा ढोल वाजवून वापर केला जातोय हे चुकीचे आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी दिली हे कौतुक आहे. महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्याला अशा जबाबदाऱ्या मिळत असतील तर त्याकडे सकारात्मक बघावे, असे राऊत म्हणाले.