मुंबई - यूपीएच्या अध्यक्षपदी शरद पवारांची नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव पुढे आल्यास शिवसेना त्याला पाठिंबा देईल, असे शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आम्ही पवारांचे हितचिंतक असून ते अध्यक्ष होणार असतील तर आम्हाला आनंदच होईल असेही ते यावेळी म्हणाले. मात्र, सध्या तरी तसा कोणताही प्रस्ताव नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तसा प्रस्ताव आल्यास पवारांना पाठिंबा..
पवारांच्या यूपीएचे अध्यक्ष होण्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. मात्र हे वृत्त स्वतः पवारांनी फेटाळले असल्याचे राऊत यांनी सांगितले. शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व काम करत आहोत. पवारांना युपीएचे अध्यक्ष बनवण्याचा कोणताही प्रस्ताव आल्यास त्यास शिवसेना पाठींबा देईल असेही त्यांनी सांगितले. आम्ही त्यांचे हितचिंतक असून ते अध्यक्ष झालेले आम्हाला आवडेल असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
यूपीएला मजबूत करण्यासाठी निर्यण घ्यावा लागेल..
देशातील सध्याची स्थिती पहाता सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी काही ठोस निर्णयही घ्यावे लागतील. काँग्रेस हा राष्ट्रीय आणि मोठा पक्ष आहे. मात्र, त्यांना लोकसभेत विरोधीपक्षनेतेपदही मिळवता आले नाही हेही सत्य आहे. त्यामुळे केंद्रातही महाराष्ट्रासारखी आघाडी बनणे गरजेचे आहे. त्याचे नेतृत्व कोण करणार हाही प्रश्न आहेच, पण सर्वांनी एकत्र येत याबाबत निर्णय घेतला पाहिजे असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्टीकरण..
दिल्लीत शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात सुरू केलेल्या आंदोलनावरून देशाचे लक्ष विचलित व्हावे, म्हणूनच काही लोकांकडून संयुक्त पुरोगामी आघाडीचे (युपीए) नेतृत्व शरद पवार करतील आणि तेच पुढे पंतप्रधान होतील अशा प्रकारची चर्चा सुरू करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद अथवा त्यांचे नेतृत्व द्यावे, अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव महाविकास आघाडी आणि युतीच्या समोर आलेला नाही आणि तशी चर्चाही कुठे सुरू नाही. परंतू, या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात असल्याचेही तपासे म्हणाले.
हेही वाचा : शरद पवार होणार युपीएचे अध्यक्ष? राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण