मुंबई - स्त्रियांवर अत्याचार किंवा त्यांना त्रास देणाऱ्या आरोपीला कुठलीही जात नसते. त्यामुळे शिवसेना नेते संजय राठोड यांच्या मुसक्या आवळून त्यांची चौकशी झाली पाहिजे, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले. पूजा चव्हाणच्या मृत्यूला संजय राठोड जबाबदार आहेत. राठोडच पूजा चव्हाण हिचा हत्यारा असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
समाजाला वेठीस धरून मी निर्दोष आहे, हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न संजय राठोड यांनी केला आहे. याला काहीही अर्थ नाही. कारण गुन्हेगाराला कोणतीही जात नसते हे मानणारी मी आहे. १५ दिवसानंतर बंजारा समाजाची काशी असणाऱ्या पवित्र पोहरादेवीकडे जाऊन संजय राठोड यांनी पोहरादेवीचं दर्शन घेतलं. हे म्हणजे स्वतः केलेल्या पापाची कबुली देण्यासाठी संजय राठोड तेथे गेले आहेत.
संजय राठोड यांना मुख्यमंत्री अभय देत आहेत-
ज्या पद्धतीने स्वतः चूका करायच्या आणि संपूर्ण समाजाला वेठीस धरायचं हा एक नवा ट्रेंड राजकारणात सुरू झालेला आहे. त्या-त्या ठिकाणी त्या-त्या मंत्र्याच्या समाजाला एकत्रित करायचं त्याचे फोटो, व्हिडिओ पाठवायचे, असे करून समाजाला एकत्रित करायचं, असे सुरू आहे. लाखो लोकांनी जरी त्या ठिकाणी एकत्रित येऊन मोठ-मोठ्या घोषणा केल्या. तरीही संजय राठोड हा हत्यारा आहे. यावर आम्ही ठाम आहोत. कारण अद्याप सर्वच प्रश्न अनुत्तरीत आहेत, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.
हेही वाचा- कोरोना अपडेट : पोलीस खात्यात 50 टक्के उपस्थिती, वर्क फ्रॉम होम सुरू