मुंबई - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर संभाजी ब्रिगेडने आंदोलन केले. मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि इतर विषयी चर्चा करण्यासाठी संभाजी ब्रिगेड यांनी पत्र लिहून आदित्य ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली होती. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना वेळ न दिल्याने मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण होते.
- कार्यकर्ते आक्रमक -
मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या आरक्षणाला संरक्षण द्यावे, सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी नोकरीस पात्र 2187 उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्या कराव्यात. मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क तत्काळ माफ करावे, सर्व घटकांची जातीनिहाय जनगणना करावी. मराठा समाजाचे ओबीसी समाजात विलगीकरणासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, आदी मागण्यांचे निवेदन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी वेळ मागितली होती. दुपारी दोनच्या सुमारास कार्यकर्ते पर्यावरण मंत्र्यांच्या निवासस्थानी जमा झाले.
- तणावाचे वातावरण -
दरम्यान, यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी हटकले. मात्र, निवेदन देण्याच्या मागणीवर कार्यकर्ते ठाम होते. पोलिसांनी अडवल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांचा गोंधळ वाढल्याने पोलिसांनी त्यांची धरपकड केली. काहीकाळ त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा - लॉकडाऊनमुळे व्यवसाय बदलून सुरू केले शेळीपालन; बिबट्याच्या हल्ल्यात टेलरचा मृत्यू