मुंबई - अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचा शेजारी केतन कक्करने (Ketan Kakkar) यांच्यातील भांडण सध्या चर्चेत आहेत. दिवसेंदिवस हे प्रकरण गंभीर होत चालले आहे. सलमानने शेजाऱ्यावर मानहानीचा दावा (Defamation Case) ठोकला आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणीत सलमानची बाजू मांडणाऱ्या वकिलाने सांगितले की, त्याचा शेजारी विनाकारण त्याचा धर्म या भांडणात आणत आहे. सलमान खानच्या फार्महाऊस शेजारी प्लॉट घेणाऱ्या केतन कक्करने एका यूट्यूब चॅनलवर अनेक आरोप केल्यानंतर हा वाद सुरू झाला आहे. यानंतर सलमानच्यावतीने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- पुढील सुनावणी 24 जानेवारीला -
सलमानने शेजाऱ्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. मुंबईच्या दिवाणी न्यायालयात पनवेल येथील फार्म हाऊसजवळील जमिनीच्या मालकाविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. या याचिकेवर आज (21 जानेवारी) मुंबई दिवाणी न्यायालयात सुनावणी झाली. आज देखील न्यायालयाने कुठलाही निर्णय दिला नाही. पुढील सुनावणी 24 जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे.
- काय आहे प्रकरण?
सलमान खानने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, केतन कक्करने एका यूट्यूब चॅनलवर बोलताना आपल्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यामुळे माझ्याबद्दल असलेला हा आक्षेपार्ह कंटेट काढून टाकला जावा आणि ज्या प्लॅटफॉर्मवर हा कंटेट उपलब्ध आहे ते ब्लॉक केले जावे अशी मागणी सलमान खानने याचिकेत केली आहे. त्यासोबतच सदर व्हिडिओतील अन्य दोन जणांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याप्रकरणी ट्विटर, फेसबुक, यूट्युब आणि गुगललाही सलमाननं प्रतिवादी केले आहे. तसेच खटला प्रलंबित असेपर्यंत संबंधित जमीन मालकाने कुठलीही बदनामीकारक विधाने करू नयेत असे अंतरिम आदेश तातडीनं देण्याची विनंतीही सलमानने केली होती. तूर्तास तसे कोणतेही आदेश न देता न्यायालयाने सुनावणी 24 जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे. या याचिकेवर न्यायाधीश अनिल लद्दाद यांच्यासमोर सुनावणी पार पडली.
- केतनने सलमानवर केलेले आरोप -
केतन कक्कर यांनी व्हिडिओ, ट्विटरवरून केलेले आरोप हे खोटे, अपमानास्पद आणि बदनामी करणार आहेत. त्यामुळे सलमान आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा दावा सलमानच्यावतीने बाजू मांडताना केला. मुळात सलमान आणि एनआरआय असलेल्या कक्करमध्ये जागेच्या अतिक्रमणावरून वाद आहे. मात्र कक्कर याने केलेले हे सर्व आरोप वैयक्तिक पातळीवरचे आहेत. चाईल्ड ट्रॅफिकिंग, ड्रग ट्रॅफिकिंग, बलात्कार, सुशांत सिंगला ठार मारले, अंडरवर्ल्डशी संबंध, लँड माफिया, दहशतवादी असे अनेक आरोप कोणताही पुरावा नसताना कक्कर यांच्याकडून केले आहेत. तसेच या प्रकरणाला धार्मिक रंगही देण्याचा प्रयत्नही केला आहे, असा आरोपही सलमानच्यावतीनं न्यायालयात करण्यात आला.