मुंबई - मुंबईत कोरोना लसीकरण सुरू असले तरी मुस्लिम समाजात शंका असल्याने धार्मिक कारणांमुळे लसीकरणाला उशीर झाला. त्यामुळे धार्मिक नेते आणि सलमान खान (Salman Khan) सारख्या अभिनेत्यांनी पुढे येऊन मुस्लिम धर्मियांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचे मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी व्यक्त केले आहे.
धार्मिक नेते, अभिनेत्यांकडून जनजागृती -
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या स्मृतीदिनी अभिवादन केल्यानंतर महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना लसीकरण सुरू झाले तेव्हापासून मुस्लिम धर्मीय नागरिकाना लसीबाबत शंका होती. त्यामुळे लसीकरणाला थोडा विलंब झाला होता. अशा परिस्थितीत लसीकरण झाल्यास वाद निर्माण झाला असता यामुळे सलमान खानसारख्या अभिनेत्यांनी त्यांना लसीकरण करण्याबाबत प्रोत्साहित केले पाहिजे, असे महापौरांनी म्हटले आहे. मुस्लिम विभागात कमी प्रमाणात लसीकरण होत असल्याने सरकारकडून धार्मिक नेते व अभिनेत्यांना सोबत घेऊन लसीबाबत जनजागृती करण्याचा विचार सुरू आहे. सलमान खान यासारख्या अभिनेत्यांना लसीबाबत जनजागृती करण्यासाठी विनंती केली जाणार आहे अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
1 कोटी 50 लाख डोस -
मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 53 हजार 775 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी 91 लाख 20 हजार 112 लाभार्थ्यांना लसीचा पहिला तर 59 लाख 33 हजार 663 नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. मुंबईला केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात आलेले लसीच्या पहिल्या डोसचे उद्दिष्ट पालिकेने पूर्ण केले आहे. तसेच दीड कोटी लसीचा टप्पाही पालिकेने ओलांडला आहे.