मुंबई - शंभर कोटी कथित वसुली प्रकरणात निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे ( Sachin Waze ) यांनी आज सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात गुन्ह्यातून मुक्त (डिस्चार्ज) करण्याकरीता अर्ज दाखल केला. यावरून मुंबई सत्र न्यायालयातील ( Mumbai Sessions Court ) विशेष सीबीआय कोर्टाने ( Special CBI Court ) सचिन वाझे यांना चांगलेच फटकारले. जर असे पुन्हा केले तर माफीचा साक्षीदार म्हणून केलेला अर्ज नामंजूर करण्यात येईल, अशी तंबी देखील सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांना दिली आहे.
देशमुख, वाझे न्सयायालयासमोर हजर - सचिन वाझे यांना आज विशेष सीबीआय कोर्टात हजर करण्यात आले होते. मागील सुनावणीदरम्यान सचिन वाझे यांचा माफीचा साक्षीदार अर्ज न्यायालयाने मंजूर केला होता. त्यावेळी 7 जून रोजी सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आज मुंबई सत्र न्यायालयात या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ), सचिन वाझे, कुंदन शिंदे, संजीव पालांडे या सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
वाझेंच्या जामीन अर्जावर 20 जूनला सुनावणी - सचिन वाझे यांनी आज मुंबई सत्र न्यायालयात शंभर कोटी वसुली प्रकरणात जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 20 जून रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. वसुली प्रकरणात मुख्य आरोपी अनिल देशमुख यांच्या विरोधात सचिन वाझे माफीचे साक्षीदार झाले असल्याने त्यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे. न्यायालयात आज डिस्चार्ज अर्ज सादर करताना न्यायालयाने सचिन वाझे यांना म्हटले आहे की, असे पुन्हा केल्यास तुम्ही केलेला डिस्चार्ज अर्ज आणि जामीन अर्ज दोन्ही फेटाळण्यात येतील. पुन्हा असा अर्ज करू नये, अशी ताकीद न्यायालयाने आज वाझे यांना दिली आहे.
काय आहे प्रकरण? - मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.