मुंबई - भाजपाकडून आज (सोमवार) राज्यभर मंदिर उघडण्यासाठी निदर्शने केली जात आहेत. तसेच राज्यात सण आणि उत्सवाचे दिवस आहेत. मात्र या सण-उत्सवाच्या दिवसांमध्ये राज्य सरकारने काळजी घेतली पाहिजे. उत्सवावर निर्बंध घातले पाहिजेत असे पत्र केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहे. तरीही भाजपाचे नेते आज राज्यभर मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन का करतात? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. याआधीही दुसरी लाट वाढवण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले, आता तिसरी लाट आणण्यासाठी देखील भाजपाचे नेते कारणीभूत ठरतील असा टोलाही सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमधून लगावला आहे.

भाजपाचा जनतेच्या जीवाशी खेळ -
राज्यभरात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून मंदिरे खुली करण्यासाठी शंखनाद आंदोलन केले जात आहे. या आंदोलनांमध्ये कोरोनाच्या निर्बंधांचे उल्लंघन होत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा मास्क लावत नाहीत. मोदी सरकारच्या निर्देशांना भाजपाचे नेतेचे किंमत देत नाहीत. हे सर्व करून भाजपा नेते केवळ सामान्य जनतेच्या जीवाशी खेळत आहेत असा आरोपही सचिन सावंत यांनी केला आहे.
राज्यभरात शंखनाद -
राज्यातील मंदिर सर्वसामान्य लोकांसाठी खुली करण्यात यावी. यासाठी भारतीय जनता पक्षाकडून आज राज्यभर शंखनाद आंदोलन करण्यात येणार आहे. याआधीही राज्य सरकारने मंदिर खुली करावी त्यासाठीचा इशारा भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीने दिला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आली आहेत. हॉटेल, मॉल्स आणि दारूची दुकान हे सर्व अटी नियम लागू करून खुली करण्याला राज्य सरकारने परवानगी दिली. मग मंदिरातही दर्शनासाठी अटी नियम लावून, मंदिर खुली करण्यात यावी अशी मागणी सातत्याने भाजपाकडून होत आहे. त्यामुळे आज राज्यभरात महत्त्वाच्या मंदिरांसमोर शंखानाद आंदोलन करण्याचा इशारा भाजपाकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा - 'मंदिरं उघडा अन्यथा तांडव होईल', भाजपचं आज राज्यभर शंखनाद आंदोलन