मुंबई - ईशान्य मुंबईची जागा मनसेच काय, पण काँग्रेसलादेखील सोडणार नसल्याचे राष्ट्रवादी मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभेत आकाराला येत असलेल्या आघाडीत मनसेला घेऊन ही जागा मनसेला देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर सचिन अहिर यांनी हे वक्तव्य केले. विक्रोळी टागोर नगर येथे राष्ट्रवादीच्या 'निर्धार परिवर्तनाचा' या अभियानाच्या अंतर्गत आयोजित सभेत अहीर बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात राज्यातही महाआघाडी करण्याचा प्रयत्न काँग्रेस राष्ट्रवादीकडून होत आहे. या आघाडीत मनसेला घेऊन ईशान्य मुंबईची जागा मनसेला सोडण्याची जोरदार चर्चा आहे. या विषयी अहीर यांना विचारणा केली असता, ते म्हणाले ईशान्य मुंबईची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने एकदा जिंकली आहे. कोणत्याही स्थितीत ही जागा मनसेलाच काय पण काँग्रेसलाही सोडणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ राज्यभरात निर्धार परिवर्तनाचा संपर्क यात्रा काढली जातेय. या अंतर्गत विक्रोळीत या सभेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपने दिलेली खोटी आश्वासने लोकांसमोर मांडायची वेळ आली असल्याचे अहीर यांनी यावेळी सांगितले. नोटबंदी, जीएसटी आणि महागाईने लोकांची कंबर मोडली आहे. गेल्या साडे चार वर्षात चुकीच्या कृषी धोरणामुळे सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याचा आरोप करत, आम्ही हे सरकार घालवणार असल्याचे अहिर यांनी यावेळी सांगितले.