मुंबई - आजपासून (गुरुवारी) राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. 3 मार्चपासून 25 मार्चपर्यंत होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनात 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधीच हे अधिवेशन वादळी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. विरोधक प्रत्येक मुद्यावर राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल, असे वाटत असतानाच पहिल्याच दिवशी सरकारी पक्षाचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचे आमदार आणि मंत्री राज्यपालांच्या विरोधात आक्रमक झाले होते. राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी तिन्ही पक्षाकडून करण्यात आली. विधान भवनाच्या पायर्यांवर राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड यांनी थेट शीर्षासन करत राज्यपाल यांचा निषेध नोंदवला.
- राज्यपालांच्या वक्तव्याचा सरकारकडून निषेध
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत केलेल्या विवादित विधानावरून तिन्ही पक्ष आक्रमक झाली होती. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांचे अभिभाषण होते. मात्र राज्यपालांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली असता सत्ताधारी पक्ष आक्रमक होऊन राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीच्या गोंधळात राज्यपालांना आपले अभिभाषण करता आले नाही. राज्यपालांना आपले अभिभाषण अर्धवट सोडण्याची वेळ सत्ताधाऱ्यांच्या गोंधळामुळे आली. तसेच राज्यपाल अभिभाषणानंतर होणाऱ्या राष्ट्रगीताला देखील थांबले नाहीत. या मुद्यावरून देखील सरकारी पक्ष राज्यपालांच्या विरोधात आक्रमक झाले.
- राज्यपालांनी माफीसाठीचा प्रस्ताव
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत विवादित वक्तव्या नंतर राज्यपालांविरोधात माफीचा प्रस्ताव आणणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. तर राज्यपालांच्या अभिभाषणात बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या झालेल्या विटंबनावर निषेध करण्यात आला होता. तो निषेध करावा लागू नये यासाठी राज्यपालांनी आपले अभिभाषण अर्ध्यातून सोडले, असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
- पंतप्रधानांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक होण्याची शक्यता
महाराष्ट्रातून येणार्या मजुरांमुळे देशभरात कोरोना पसरला, असे वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषणादरम्यान केले होते. या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाला असल्याचे सांगत काँग्रेस आक्रमक झाली होती. हाच मुद्दा अधिवेशनात देखील गाजण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा निषेध म्हणून सरकारी पक्ष या मुद्द्यावर देखील अधिवेशनात आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.
- नवाब मलिकांच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात यावा, यासाठी आज विरोधक पहिल्याच दिवशी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. नवाब मलिक यांनी केलेल्या जमीन व्यवहारात थेट दाऊद याचा हात आहे. तरीही राज्य सरकार नवाब मलिक यांचा राजीनामा घेत नाही. म्हणजे दाऊदला हे सरकार पाठीशी घालत आहे का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. यासंबंधी दाऊदचे बॅनर थेट विधान भवनात झळकवण्यात आले.
हेही वाचा - Devendra Fadnavis : मागासवर्गीयांचा डाटा न्यायालयाने नाकारल्याने सरकारची नाचक्की झाली - देवेंद्र फडणवीस