मुंबई- दरवर्षी पावसाळ्यात शहरातील रस्त्यावर खड्डे पडतात. मुंबईत गेल्या सहा वर्षात २४ हजार १४६ खड्डे भरण्यासाठी तक्रारी आल्या आहेत. पालिकेने खड्डे भरण्यासाठी गेल्या सहा वर्षात ११३ कोटी रुपये खर्च केले आहेत. खड्डे भरण्यासाठी करण्यात आलेल्या खर्चाची आकडेवारी पाहिल्यास या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी केला आहे. तसेच खड्डे बुजवण्याच्या कामात पारदर्शकता आणावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी मुंबई महापालिकेकडून खड्डे बुजवण्याची आकडेवारी मागितली होती. पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार २०१३ ते ३१ जुलै २०१९ पर्यंत मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या एकूण २४ हजार १४६ ऑनलाइन तक्रारी प्राप्त झाल्या व त्यापैकी २३ हजार ३८८ खड्डे भरल्याचा दावा पालिकेने केला आहे. २०१३ ते २०१९ या कालावधीत मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी एकूण १७५ कोटी ५१ लाख ८६ हजार इतकी तरतूद करण्यात आली होती. तरतूद केलेल्या निधीपैकी आतापर्यंत ११३ कोटी ८४ लाख ७७ हजार हजार रुपये खड्डे बुजवण्यासाठी खर्च झाले आहेत.
एक खड्डा बुजवायला १७ हजार रुपये खर्च
मुंबई महापालिकेने २०१७ -१८ ते २०१८-१९ या दोन वर्षात ८ हजार ८७९ खड्डे बुजविण्यासाठी तब्बल १५ कोटी ७१ लाख २९ हजार रुपये खर्च केल्याचे माहिती अधिकारात शकील अहमद शेख यांना कळविले आहे. गेल्या दोन वर्षात खड्डे बुजवण्यासाठी केलेला खर्च पाहिल्यास एक खड्डा बुजवायला १७ हजार रुपये खर्च झाले आहेत.
कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप
२०१३ पासून आतापर्यंत खड्डे बुजवण्यासाठी केलेला खर्च पाहता हा खर्च अनाकलनीय आहे. यामुळे खड्डे बुजवण्यासाठी करण्यात येणाऱ्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप शकील अहमद यांनी केला आहे. पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी खड्डे बुजवण्याच्या कामात पारदर्शकता आणून खड्डे आणि त्यासाठी केला जाणारा खर्च याची आकडेवारी पालिकेच्या संकेत स्थळावर प्रकाशित करावी, अशी मागणी शकील अहमद यांनी केली आहे.