मुंबई - महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने सुधारित वेळापत्रक आज जाहीर केले आहे. त्यानुसार आता राज्य सेवा पूर्व परीक्षा 23 जानेवारी 2022 आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पेपर एक 29 आणि पेपर दोन परीक्षा 30 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा - Mumbai Water Taxi Service : मुंबईत अत्याधुनिक वॉटर टॅक्सी दाखल; प्रवाशांना मिळणार 'या' सुविधा
या कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलली होती
गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे शासकीय सेवेतील भरती प्रक्रिया रखडली होती. याचबरोबर शासकीय सेवेसाठी परीक्षा सुद्धा होऊ शकल्या नाहीत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा घेण्याचे ठरविले होते. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षा 2021 अंतर्गत 390 पदांसाठी परीक्षा घेण्याचे निश्चित केले होते. ही राज्य सेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 ला घेण्याचे ठरवले होते. या परीक्षेला 2 लाख 51 हजार 589 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होते. मात्र, या परीक्षेत अनेक उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना एक संधी मिळावी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता आयोगाने आपल्या सुधारित वेळापत्रक जाहीर केलेला आहे.
असे आहे नवीन वेळापत्रक -
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुधारित वेळापत्रक आज जाहीर केले आहे. त्यानुसार 2 जानेवारीला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा आता 23 जानेवारी 2022 ला होणार आहे. तर 22 जानेवारीला होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पेपर 1 सुधारित वेळापत्रकानुसार 29 जानेवारी 2022 ला आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पेपर दुसरा 30 जानेवारी 2022 ला होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात दिलेली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून आढावा घेण्यात येईल. तसेच, या बाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली.
या पदांसाठी होणार परीक्षा -
उपजिल्हाधिकारी 12, पोलीस उपअधीक्षक 16, सहकार राज्य कर आयुक्त 16, गटविकास अधिकारी 15, सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट - अ 15, उद्योग उप संचालक 4, सहाय्यक कामगार आयुक्त 22, उपशिक्षणाधिकारी 25, कक्ष अधिकारी 39, सहाय्यकक प्रादेशिक परिवहन अधिकारी 4, सहाय्यक गटविकास अधिकारी 17, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था 18, उपअधीक्षक भूमि अभिलेख 15, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क 1, उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क 1, सहकारी कामगार अधिकारी 54, मुख्याधिकारी गट ब 75, मुख्याधिकारी गट अ 15 पदं, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ 10 अशा 290 पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
हेही वाचा - Sandalwood smuggling : चंदन तस्कर बादशाह मलिक 15 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी