मुंबई : गृहखात्याला मुंबई पोलिसांनी दिलेल्या अहवालातून झालेल्या खुलाशांमुळे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाने गृह विभागाच्या मागणीवरून अहवाल सादर केला आहे. सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांची जवळीक या अहवालातून स्पष्टपणे दिसून येत आहे. वाझेंच्या नियुक्तीला काही अधिकाऱ्यांचा विरोध होता हेही अहवालातून स्पष्ट झालंय. हा संपूर्ण अहवाल चार पानी आहे.
काय म्हटलंय या अहवालात? मुद्दा क्र. 1 - सचिन वाझे यांना निलंबनातून पुन:स्थापित कसं केलं आणि पुन:स्थापित करण्याचा निर्णय कसा घेतला?
माहिती - सचिन वाझे यांना सेवेत पुन:स्थापित करण्याचा निर्णय निलंबन आढावा बैठकीत घेण्यात आला. हा निर्णय तत्कालीन पोलीस आयुक्त, तत्कालीक पोलिस सहआयुक्त(प्रशासन), तत्कालीक अपर आयुक्त आणि तत्कालीक पोलिस उपआयुक्त यांच्या बैठकीत घेण्यात आला.
मुद्दा क्र. 2 - कार्यकारी पदावर पुन:स्थापना का व कोणाकडून देण्यात आली?
माहिती - दि. ८/६/२० रोजी पोलीस अस्थापना मंडळाच्या बैठकीत वाझे यांची नियुक्ती करण्यात आली.
मुद्दा क्र. 3 - सचिन वाझे हाताळत असलेल्या गुन्ह्यांच्या तपासासंदर्भात कोणते वरिष्ठ अधिकारी पुनर्विलोकन करुन निर्देश देत होते?
माहिती - सचिन वाझे कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिपोर्टींग करत नव्हते. तत्कालीन पोलीस आयुक्त यांना परस्पर रिपोर्ट करत असल्याने तत्कालीन पोलीस आयुक्त, यांच्या व्यतिरिक्त गुन्हे शाखेत कोणत्याही अधिकाऱ्यांनी वाझेंना निर्देश दिलेले नव्हते.
मुद्दा क्र. 4 - सचिन वाझे कार्यालयात येण्यासाठी कोणते वाहन वापरत होते?
माहिती - सचिन वाझे कार्यालयात येण्यासाठी मर्सिडीज बेंझ, ऑडी इत्यादी खाजगी वाहनांचा वापर करत होते.
मुद्दा क्र. 5 - सीआययू प्रमुखाचे पद सर्वसाधारणपणे कोणत्या दर्जाचे असते?
माहिती - सीआययू कक्षाचे प्रभारी पद हे सर्वसाधारणपणे पोलीस निरीक्षक दर्जाचे असते.
मुद्दा क्र. 6 - सचिन वाझे कोणाला रिपोर्टींग करत होते आणि कोणाच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा तपास सुरू होता?
माहिती - सचिन वाझे हे तत्कालीन पोलीस आयुक्त यांनाच रिपोर्टींग करत होते तसंच त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तपास करत होते. सचिन वाझे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिपोर्ट करत नव्हते. त्याचप्रमाणे सचिन यांनी त्यांचे सहकारी यांना सुद्धा गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिपोर्ट करण्यास सक्त मनाई केली होती.
वाझेंना स्पेशल ट्रिटमेंट?सचिन वाझेंना पोलीस दलात पुन्हा घेण्यासाठी अनेक पोलीस अधिकाऱ्यांचा कठोर विरोध होता. तत्कालीन पोलीस सहआयुक्त (गुन्हे) यांचा सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यासाठी तीव्र विरोध असल्याचं या रिपोर्टमधून स्पष्ट दिसून येतं. या स्वरूपाची नोंदही या रिपोर्टमध्ये करण्यात आली आहे. या रिपोर्टमध्ये असे देखील नमूद करण्यात आले आहे की, महत्त्वाच्या ब्रिफींगदरम्यान तात्कालीन पोलीस आयुक्तांसोबत वाझे वेळोवेळी हजर असायचे. तसेच एखाद्या गुन्ह्यासंदर्भात निर्णायक आणि तपासाला दिशा देणाऱ्या मुद्द्यावर झालेला निर्णय सचिन वाझे हे गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवायचे.
हेही वाचा - विरोध झुगारून परमबीर सिंगांनी वाझेंना सेवेत घेतले, गृहखात्याला दिलेल्या अहवालातून खुलासा