नाशिक - मनसे आणि भाजपाच्या युतीबाबत राजकारणाच्या वर्तुळात चर्चा रंगत असताना रविवारी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे. या दोन्ही नेत्यांनी रविवारी सकाळी एकत्र विश्रामगृह परिसरात मार्निंग वाॅक केला. यावेळी दोघांमध्ये राजकीय चर्चाही झाली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही नेत्यांमध्ये युती संदर्भातील साखरपेरणी झाली नसेल ना, अशी चर्चा आता रंगली आहे.
पालिका निवडणूक पार्श्वभूमीवर दोघेही नेते आप आपल्या पक्षबांधणीसाठी नाशकात आहेत. दोघांचाही मुक्काम शासकीय विश्रामगृहात आहे. योग आला तर नक्की भेट घेऊ असं चंद्रकांत पाटील दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. अखेर रविवारी सकाळी हा योग जुळून आला. चंद्रकांत पाटील व राज ठाकरे यांच्याशी झाली भेट झाली. शासकीय विश्रामगृहात दोघांची एकत्रित चर्चा झाली. या दोघांच्या बैठकीचे अनेक अर्थ काढले जात असून आगामी काळात भाजप-मनसे युतीची नाशकात नांदी होत असल्याची चर्चा रंगत आहे.
दोन्ही पक्षांच्या युतीचे संकेत-
अखेर भाजप आणि मनसे या दोन पक्षांच्या युती संदर्भातलं एक पाऊल पुढे गेल्याचे नाशकात दिसून आले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट झाली. या भेटीतून या दोन्ही पक्षांच्या युतीचे संकेत मिळत आहेत. दोन दिवसापासून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नाशिक दौऱ्यावर आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या शुक्रवारी संध्याकाळी पासून नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत. हे दोघेजण योगायोगाने एकाच ठिकाणी म्हणजे शासकीय विश्रामगृहामध्ये वास्तव्य आहे. त्या दरम्यान आज सकाळी दोघांमध्ये भेट होऊन राजकीय चर्चा झाली आहे. त्यामुळे दोन्ही नेत्याच्या भेटीमागे युतीचे संकेत दडले असल्याची चर्चा आता रंगु लागली आहे.
या दोन्ही राजकीय पक्षांच्या प्रमुखांना नाशिक दौरा हा आगामी होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आले आहेत. त्या दृष्टिकोनातून त्यांनी पक्ष संघटन मजबूत करणे तसेच पक्ष कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेणे या सर्व बाबींवर चर्चा केली. आगामी काळात पक्षबांधणी हा देखील या दोन्ही नेत्यांचा मुख्य उद्देश आहे. नाशिक दौऱ्यावर आले असताना चंद्रकांत पाटील यांनी जर वेळ मिळाला तर राज ठाकरे यांची भेट घेऊ, असे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतर योगायोगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या पुढील नियोजित कार्यक्रमाला जात असताना अचानक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे शासकीय विश्रामगृहात आगमन झाले. त्यानंतर या दोघांनी शासकीय विश्रामगृहाच्या पटांगणात एकमेकांची भेट घेऊन चर्चा केली. आगामी काळात भाजपा व मनसे युती ही शक्यता यामुळे अधिक स्पष्ट झाली आहे. या भेटीचा तपशील दोन्ही नेत्यांनी सांगितले नसला तरी या भेटीतून मनसे-भाजप युतीची नांदी असल्याचे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.