मुंबई - बुधवारी मुंबईत जोरदार पाऊस पडला, यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, आज सकाळपासूनच पावसाने मुंबईत विश्रांती घेतलेली आहे. पुढील तीन दिवस मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आलेला आहे. गुरूवारी मुंबईत झालेल्या तुफान पावसाने मुंबईकरांना मेटाकुटीस आणले होते. लोकल सेवा आणि रस्ते वाहतुकीवर ती या पावसाचा परिणाम जाणवून आला होता. यामुळे अनेक तास चाकरमान्यांना ताटकळत उभे राहावे लागले होते. आज पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, पाऊस पुन्हा कधीही सुरू होऊ शकतो अशी शक्यता देखील हवामान खात्यावर वर्तवली आहे.
मुंबईच्या अनेक भागात साचले होते पाणी -
मुंबईत काल झालेल्या पहिल्याच पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपले. पहिल्याच पावसात मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले होते. यामध्ये रस्ते वाहतूक पुर्णपणे कोलमडली होती. रेल्वे सेवा संपूर्ण ठप्प झाली होती. आजही पावसाची संततधार सुरुच असून काही भागात मात्र पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आहे. असे असले तरीही आज मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढचे 3-4 मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वतीने करण्यात आले आहे. मुंबईत मागील 24 तासांत 231.3 मिमी पाऊस झाला असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
पावसामुळे मुंबईत लोकल सेवा थांबली -
काल पहिल्याच दिवशी पावसाने मुसळधार आगमन केल्याने मुंबईकरांची त्रेधा तर उडालीच. परंतू, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही कोलमडली. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले. प्रामुख्याने सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता आदी ठिकाणी मुंबई तुंबल्याचे पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे मुंबईत लोकल सेवा थांबली. रस्त्यांवरही पाणी साचल्याने रस्ते वाहतूकही ठप्प झाली. प्रामुख्याने सीएसएमटी ते ठाणे आणि सीएसएमटी ते मानखुर्द रेल्वे वाहतूक थांबविण्यात आली होती.
समुद्राला उधा येणार? -
आजही मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर समुद्रालाही उधाण येणार आहे. आज दुपारी 12 वाजून 17 मिनिटांनी समुद्राला भरती येणार आहे. 4.26 मीटर उंच लाटा उसळणार असल्याची शक्यता आहे.