मुंबई - शनिवारी रात्रीपासून मान्सूनच्या पावसाने मुंबईसह कोकणाला झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळणे, संरक्षक भिंत कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. मात्र मुसळधार पावसाचा अंदाज अजूनही कायम असल्यामुळे मुंबईकरांचा टेंशन मात्र वाढले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना पुढचे 24 तास अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील तीन तास या चारही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ शुभांगी भुत्ते यांनी दिली आहे.
कोकणाला पुढील पाच दिवसांसाठी रेड अॅलर्ट आणि ऑरेंज अॅलर्टचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे मुंबईकरांसह कोकणातील जिल्ह्यांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. इतर राज्याच्या इतर भागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुंबईत पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आलीआहे. या काळात वाऱ्याचा वेगही 45-55 kmph ते 65 kmph एवढा असण्याचा इशारा देण्य़ात आला आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबईला मुसळधार ते अति मुसळधार मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे.
हे ही वाचा - कुत्री सोडल्यासारखी तपास यंत्रणा सोडलीय, पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्र सरकारवर टीका
भारतीय हवामान विभागाने १८ जुलैसाठी कोकणातील सर्व जिल्हे म्हणजे मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला रेड अॅलर्ट दिला आहे. तर, १९ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, सातारा, पुणे आणि कोल्हापूरला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तर मुंबईला उद्या सकाळी दहा नंतर ऑरेंज अलर्ट दिला आहे.
१८ जुलैला पालघऱ, ठाणे, पुणे सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट दिला गेला आहे. तर, १९ जुलै रोजी पुणे, ठाणे, मुंबई आणि पालघरला ऑरेंज अॅलर्ट दिला गेला आहे. २० जुलै, २१ जुलै आणि २२ जुलै रोजी कोकणातील सर्व जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूरला ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पाऊस दमदार हजेरी लावू शकतो.
हे ही वाचा - मुंबईत पावसामुळे 21 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत
१८ जुलै रोजी नंदूरबार, अमरावती, नागपूर, अकोला, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना यलो अॅलर्ट दिला आहे. तर १९ जुलै रोजी बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. २० जुलै रोजी अमरावती आणि नागपूर तर २१ जुलै रोजी चंद्रपूर आणि गडचिरोली आणि २२ जुलै रोजी भंडारा आणि गोंदियाला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. यलो अॅलर्ट दिलेल्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ, शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुण्यात रिमझिम पाऊसाला सुरुवात झाली आहे. मोठ्या विश्रांतीनंतर पाऊसाचे आगमन झालं आहे. शहरासह धरण क्षेत्रातही पाऊस सुरु झाल्यामुळं नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.