मुंबई - राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक याचिका फेटाळली असल्याचा निकाल दिला. परंतु, एकूण निकाल वाचल्यास याप्रकरणाची इतर यंत्रणांकडून म्हणजेच 'सीबीआय' अथवा संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करता येऊ शकते, असे स्पष्ट संकेत त्यात दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय आणि संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केली.
हेही वाचा... देवेंद्र फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईन' वर शरद पवारांची टोलेबाजी
टिळक भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल वाचून त्याविषयी पुन्हा नव्याने तपास कसा होऊ शकतो, याची माहिती दिली. न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आपल्या निकाल पत्रात या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आम्हाला मर्यादित अधिकार असले, तरी यात चौकशी केली जाऊ शकते, असे म्हटले आहे. तसेच या पुनर्विचार याचिकेत ललिता कुमारी यांच्या खटल्याचा दाखला देत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे आम्ही जरी चौकशी करू शकलो नाही, तरी सीबीआय सारखी संस्था चौकशी करू शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा... काँग्रेस नेत्यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग
राफेल प्रकरणासाठी न्यायालयात खोटी माहिती का देण्यात आली? हा आमचा महत्त्वाचा विषय आहे. त्यातच या विमानांच्या खरेदीची मूळ किंमत ५७० कोटीवरून १६०० कोटी कशी झाली? याचे उत्तर अजून मिळाले नाही. त्यामुळे राफेलची पुन्हा चौकशी व्हावी, यासाठी आमची मागणी होती की, एक संयुक्त संसदीय समिती नेमण्यात यावी, ती आजही तशीच असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा... BREAKING: मुख्यमंत्री निश्चितपणे शिवसेनेचा होणार - नवाब मलिक
काही दिवसांपूर्वी यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि प्रशांत भूषण यांनी राफेलवर पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाकडून फेटाळण्यात आली. गुरुवारी भाजपने या निकालाचा जल्लोष केला खरा, पण पूर्ण निकाल वाचला नाही, अशी टीकाही चव्हाण यांनी केली. राज्यातील सत्ता स्थापनेस संदर्भात चव्हाण यांना विचारले असता, ते म्हणाले की किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरू आहे. सत्ता वाटपाचे सुत्र ठरल्यानंतर निर्णय घेतला जाईल. त्यानंतर पक्षाचे वरिष्ठ याबाबतचा निर्णय घेतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा... काँग्रेस, राष्ट्रवादीसह सेनेचे नेते उद्या घेणार राज्यपालांची भेट