मुंबई - नैसर्गिक वायुवरील व्हॅटमध्ये राज्य शासनाने १३.५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कपात केल्यानंतर आता सीएनजी आणि पीएनजी पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आजपासून लागू होणार नवे दर - सातत्याने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ होत असल्याने नागरिकाचे कंबरडे मोडले होते. मात्र, आता राज्य शासनाने नैसर्गिक वायुवरील व्हॅटमध्ये १३.५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कपात केल्याने सीएनजी व पीएनजी दरात अनुक्रमे ६ व ३.५० रुपयांची कपात करण्याचा निर्णय महानगर गॅस लिमिटेडने घेतला आहे. परिणामी, मुंबई महानगरात प्रति किलो ६६ रुपयांवर असलेला सीएनजी थेट ६० रुपयांपर्यंत तर ३९.५० रुपये प्रति एससीएम असलेली पीएनजी ३६ रुपयांपर्यंत स्वस्त झाला आहे. सीएनजी व पीएनजीचे नवे दर आजपासून लागू होतील, अशी माहिती महानगर गॅस लिमिटेडतर्फे देण्यात आली.
पेट्रोल डिझेल दरवाढच - रशिया युक्रेन युद्धाचे कारण देऊन तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढ सुरूच आहे. मागच्या १० दिवसांत नऊ वेळा इंधन दरवाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पुन्हा पेट्रोल व डिझेल दरात वाढ केली. यामुळे मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ११६ रुपये ७२ पैसे तर डिझेल १०० रुपये ९४ पैशांवर पोहोचले आहेत. मागच्या दहा दिवसांपासून इंधन दरात ६.४० रुपये वाढ झाली आहे. ज्याप्रमाणे केंद्र सरकारने व्हॅटमध्ये कपात केली आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या करांमध्ये कपात करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सुद्धा नागरिकांकडून होताना दिसून येत आहे.