मुंबई - मुंबईमध्ये इंग्रजांच्या काळात रस्त्याचे अंतर मैलामध्ये मोजले जात होते. इंग्रजांच्या काळात मुंबई सायन आणि माहीमपर्यंत होती. इंग्रजांनी मैलाचे अंतर मोजण्यासाठी लावलेले दगड कालांतराने रस्त्याखाली गाडले गेले तर काही नाहीसे झाले. अशा 15 ऐतिहासिक मैलाच्या दगडांचे पालिकेने ( BMC ) जतन केले ( Historic Milestones in Mumbai ) आहे.
इंग्रजांनी लावले मैलाचे दगड - भारतावर दीडशे वर्षांहून अधिक काळ इंग्रजांचे राज्य होते. मुंबईचा वापर इंग्रजांनी व्यापार केंद्र म्हणून केला. त्यावेळी हार्निमन सर्कल येथून टांगा आणि बैलगाडी सुटायची. रस्त्यावरील अंतर कळावे म्हणून इंग्रजांनी प्रत्येक मैलावर मैलाचे दगड लावले. त्यावेळची मुंबई सायन आणि माहीमपर्यंत होती. सायनहून माहीम येथे जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्यांवर, असे दगड लावण्यात आले होते.
पालिकेला यश - 1947 ला भारत देश स्वतंत्र झाले. कालांतराने देशाचा आणखी विकास होत गेला. अनेकवेळा रस्त्यांची, फुटपाथची कामे करण्यात आली. या कामादरम्यान मैलाचे दगड रस्ते आणि फुटपाथच्या खाली गेले. काही दगड तुटले तर काही नाहीसे झाले. मुंबईचा हा ऐतिहासिक वारसा जपता यावा यासाठी पालिकेने या मैलाच्या दगडांचे जतन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पालिकेने 25 लाखांची तरतूद केली. 2017 पासून पालिकेच्या पुरातन वास्तू विभागाकडून हे दगड जतन करण्यास सुरुवात करण्यात आली. पालिकेला मिळालेल्या नोंदी प्रमाणे आतापर्यंत 15 मैलाचे दगड मुंबईत होते त्या ठिकाणी लावण्यात आले आहेत.
मैलाच्या दगडांचे जतन - मैलाचे दगड हे ऐतिहासिक ठेवा आहेत. त्याचे जतन पालिकेकडून केले जात आहे. पालिकेकडे नोंद असलेल्या 15 मैलाच्या दगडांचे जतन करण्यात आले आहे. मुंबई शहरात आणखी कुठे असे मैलाचे दगड होते का याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती मिळाल्यास त्या ठिकाणीही असे मैलाचे दगड लावले जातील, अशी माहिती पालिकेच्या पुरातन वास्तू विभागाचे अभियंता संजय सावंत यांनी दिली.
मैलाचे दगड - मुंबईत हॉर्निमन सर्कलजवळील ( Horniman Circle ) सेंट थॉमस चर्चला ( St. Thomas Church ) शून्य मैल मानून पुढील मैलाचे अंतर दाखवणारे दगड ब्रिटिशांनी बसवले होते. हे दगड साडेचार फूट ते पाच फूट उंच असून बेसॉल्ट दगड आहेत. 1816 ते 1837 या कालावधीत हे दगड लावण्यात आले. यातील शेवटचे दगड जुन्या मुंबईच्या वेशीवर म्हणजेच सायन किल्ल्याजवळ नऊ मैल, माहीम कॉज वे जवळ सहा मैल अशा ठिकाणी आढळून आले. यातील बहुतेक दगड हे रस्त्याच्या खाली, फूटपाथ खाली गेले होते. काही तुटले होते. या मैलाच्या दगडांचे जतन करण्याचा निर्णय महापालिका सभागृहाने घेतला होता. हार्निमन सर्कल, माझगाव, भायखळा, काळबादेवी, लोअर परेल, दादर, सायन, माहीम, ऑगस्ट क्रांती मैदान आदी ठिकाणी हे दगड आढळून येतात.