मुंबई - कोरोनावरील लस लवकरच उपलब्ध होणार असल्याने आता मुंबईत लसीकरण मोहिमेच्या प्राथमिक कामांना वेग देण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईत एकूण 8 ठिकाणी लसीकरण केंद्र तयार करण्यात येणार असून ही केंद्रे नेमकी कशी असतील याचे 'मॉडेल लसीकरण केंद्र' मुंबई महानगर पालिकेच्या कूपर रुग्णालयात तयार करण्यात येत असल्याची माहिती मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. या केंद्रानुसारच इतर सात केंद्रांमध्ये रचना केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
'या' आठ रुग्णालयात लसीकरण केंद्र
मार्चपासून देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. पण आता लवकरच कोरोनावरील लस उपलब्ध होणार असल्याने सगळ्या भारताचे लक्ष लसीकडे लागले आहे. भारतीय बनावटी (भारत बायोटेक कंपनी) ची 'कोवॅक्सिन' आणि ऑक्सफर्ड-सिरम इन्स्टिट्यूटची 'कोविशील्ड' या दोन लसी भारतीयांसाठी आशेचा किरण म्हणून पुढे आल्या आहेत. तेव्हा या लशी उपलब्ध होण्याआधी लसीकरणासाठीची तयारी सुरू करणे गरजेचे होते. त्यानुसार केंद्राने आणि आयसीएमआरने याला सुरुवात केली. आयसीएमआरच्या निर्देशानुसार मुंबईत ही लसीकरण मोहीमेच्या प्राथमिक तयारीला सुरुवात झाली आहे. मुंबईत 8 ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहेत. पालिकेच्या नायर, केईएम, सायन आणि कुपर या मुख्य चार रुग्णालयासह पालिकेच्या वांद्रे भाभा, कुर्ला भाभा, ट्रॉमा केअर, राजावाडी या रुग्णालयात ही लसीकरण केंद्रे उभारण्यात येणार असल्याचे काकणी यांनी सांगितले आहे. तर यादृष्टीने सर्व हॉस्पिटल तयारीला लागले आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कूपरमधील मॉडेल केंद्र पूर्णत्वाच्या दिशेने
मुंबईतील 8 केंद्र नेमके कशी असतील, केंद्रासाठी किती जागा लागेल, वेटिंग रूम कशी असावी, लसीकरण केलेल्यावर देखरेख करण्यासाठीची स्वतंत्र रूम कुठे-कशी असावी, 5 जणाना एकावेळी लस देता येईल यादृष्टीने रचना कशी करता येईल यासह अनेक गोष्टीचा विचार करत मॉडल केंद्र तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे असेही काकाणी यांनी सांगितले आहे. तर याच मॉडेलनुसार इतर केंद्राची रचना करण्यात येणार आहे. ही सर्व कामे सर्वच पूर्ण करत 8 ही केंद्र लसीकरणासाठी सज्ज करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
10 ते 15दिवसांत दीड लाख कोरोना योध्याना पहिला डोस देण्याचा मानस
कोरोना लस नेमकी कधी उपलब्ध होणार याचे ठोस उत्तरं अजून कुणाकडे नाही. पण लसीकरणाच्या तयारीला मात्र वेग आला आहे. यात मुंबई महानगर पालिका आघाडीवर आहे. 8 केंद्र तयार करण्यापासून ते कॊरोना योध्याना प्रशिक्षण देण्यापर्यंतचे काम जोरात सुरू आहे. त्याचवेळी लसीकरणाचे टप्पे ठरवण्यात आले असून पहिल्या टप्प्यासाठी सुमारे दीड लाख कॊरोना योध्याची यादी तयार करण्यात आली आहे. तेव्हा लस उपलब्ध झाल्याबरोबर पहिल्या 10 ते 15 दिवसांत या सर्व दीड लाख कॊरोना योध्याना लशीचा पहिला डोस देण्याचा मानस असल्याचे काकाणी यांनी सांगितले आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सुमारे 5 लाख फ्रंटलाइन वर्कर्सना आणि तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील नागरिकांना लशीचा पहिला डोस देण्यात येणार आहे.