मुंबई - बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग प्रकरणाला दिवसेंदिवस नवीन वळण येत असताना एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे या प्रकरणावर दररोज नवीन खुलासे करत आहेत. त्यावरून विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे.
अमली पदार्थ प्रकरणात नवाब मलिक यांचा जावई समीर खान याला समीर वानखडे यांनी अटक केली होती. त्यासाठी तो नऊ महिने तुरुंगात होता. याचाच बदला घेण्यासाठी नवाब मलिक एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्या मागे लागले आहेत का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा-मलिकांनी "ते" निनावी पत्र एनसीबीच्या महासंचालकांना पाठवले
विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, की महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या इतिहासात प्रथमच तपास यंत्रणांचा पर्दाफाश होत आहे. प्रसारमाध्यमांत नव्हे तर न्यायालयात पुरावे देण्यात यावीत. मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणतात, की महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव आहे. याचा अर्थ महाविकास आघाडीचा पद्धतशीर कार्यक्रम आहे. नवाब मलिक आणि संजय राऊत हे रोज घसा कोरडा करत आरोप करत आहेत. कर्तव्यदक्ष अधिकारी समीर वानखेडे यांना नाउमेद करण्याचे काम करत आहेत. कर नाही त्याला डर नसतो. समीर वानखेडे यांनी न्यायालयातही थेट आरोपामुळे कुटुंबाच्या जीविताला धोका असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा-माझा नवरा खोटारडा नाही, रोज काय स्पष्टीकरण द्यायचे- क्रांती रेडकर
नवाब मलिक यांनी कुठली धमकी दिली होती
नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जाहीर कार्यक्रमात वर्षभरात तुरुंगात टाकणार, असे खुले आव्हान दिले होते. वर्षभरात तुझी नोकरी जाईल, तुझा तुरुंगवास निश्चित आहे, असे वक्तव्यही मलिक यांनी जाहीर कार्यक्रमात केले होते. तुला (समीर वानखेडे) तुरुंगात टाकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, अशी धमकी नवाब मलिक यांनी पुणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमात नुकतेच दिली होती.
हेही वाचा-राज्य सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे वेतन थांबवले
समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर तसेच समीर वानखेडे यांची बहीण जास्मिन वानखडे यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांचे आरोप फेटाळले आहेत.