मुंबई - काँग्रेसने कोरोना पसरवला, अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याबद्दल त्यांनी आणि भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, या मागणीसाठी उद्या सकाळी 11 वाजता प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबई काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री व भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील मलबार येथील 'सागर' बंगला येथे 'नरेंद्र मोदी माफी मांगो आंदोलन' केले जाणार आहे. या आंदोलनाला जशास तसे उत्तर देणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
हेही वाचा - Zero Corona Death in Dharavi : कोरोनाची तिसरी लाट; धारावीत सलग दुसऱ्या दिवशी शून्य रुग्णांची नोंद
नरेंद्र मोदी माफी मांगो आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये बोलताना संसदेच्या दोन्ही सभागृहात देशात करोना काँग्रेसने पसरवला, असे आरोप केले होते. या आरोपांचा काँग्रेसकडून निषेध करण्यात येत आहे. उद्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबई काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री व भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील मलबार येथील सागर बंगला येथे 'नरेंद्र मोदी माफी मांगो आंदोलन' केले जाणार आहे. या आंदोलनामध्ये काँग्रेसचे मंत्री, प्रमुख नेते, आजी - माजी खासदार, आमदार व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनाला नेपियन्सी रोड, नारायण दाभोळकर, लक्ष्मी विलास बिल्डिंग समोरून सुरुवात होणार आहे.
भाजपही देणार जशास तसे उत्तर!
काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला असल्याकारणाने या आंदोलनाला जशास तसे उत्तर देणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. या मुद्द्यावर आता मुंबईमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध भाजप, असा सामना रंगणार आहे. या प्रश्नावर एकीकडे काँग्रेसचे मोठमोठे नेते उद्या या आंदोलनामध्ये सहभागी होत असताना भाजपही तेवढ्याच ताकतीने त्याचा विरोध करणार, हे आता स्पष्ट झालेले आहे.
हेही वाचा - Action Orders On Bike Taxi : राज्यातील अँप बेस्ड बाइक टॅक्सीवर कारवाईचे आदेश