मुंबई - आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तरप्रदेशातील विकास दुबे चकमकीसंदर्भात बोलताना 'यावर राजकारण नको' असे आवाहन केले होते. आता याउलट वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घेतली. 'दुबे चकमक' ही कोणाला तरी वाचवण्यासाठी झाल्याचा आरोप केला आहे. मातोश्रीवर ते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना हा आरोप केला आहे.
आज आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर राजगृह हल्ला तसेच बारा बलुतेदार व सध्या राज्यातील परिस्थितीबाबत भेट घेतली. यानंतर मातोश्रीबाहेर येऊन संबंधित वक्तव्य केले.
पोलीस येत असल्याची टीप देण्यात वरिष्ठांचाही हात
विकास दुबे चकमक चुकीच्या पद्धतीने झाली आहे. त्याला अटक केली, तर तुम्हीच त्याला घेऊन गेलं पाहिजे. या चकमकीमुळे पोलीस अटक करायला येत असताना कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टीप दिली हे आता उघडकीस येणार नाहीय. दुबे मेल्यामुळे ही लिंक पूर्णपणे तुटली आहे. त्यामुळे ही चकमच कोणालातरी वाचवण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
मुख्यमंत्र्यासमोर मांडले प्रश्न
आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भोई समाजाचे प्रश्न मांडले. भोई समाजाचे मुख्य साधन हे मच्छीमारी आहे. मात्र मच्छिमारी विक्री ही बोली पद्धतीने होते. हा समाज गरीब असल्यामुळे त्याला बोलीत भाग घेता येत नाही. यासाठी त्याचे ऑक्शन बंद करावे, असे आंबेडकर यांनी सांगितले.