मुंबई - अयोध्येमध्ये भव्य असे राम मंदिर उभारण्यासाठी राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून देशभरातून निधी संकलीत केला जात आहे. परंतु या ट्रस्टबरोबरच भाजप व आरएसएस देखील घरोघरी जाऊन रोखीने पैसे गोळा करत आहेत. भारतीय जनता पक्ष, आरएसएसची पार्श्वभूमी पाहता या माध्यमातून भाजप-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची दाट शक्यता आहे. असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. त्यामुळे जनतेने राम मंदिर निर्मितीसाठीचा आपला निधी राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये थेट जाईल याची खबरदारी घ्यावी. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
यासंदर्भात पत्रकार परिषेदला संबोधित करताना सावंत म्हणाले की, भाजपा व संघ परिवाराने राम मंदिराकरता या अगोरदरही निधी गोळा केला होता. त्याचे अद्याप काय झाले याची माहिती त्यांनी दिलेली नाही. राम मंदिरासाठी गेली अनेक वर्षे लढणाऱ्या निर्मोही आखाड्याने विश्व हिंदू परिषदेवर अयोध्या मंदिराकरता जमा केलेले १४०० कोटी रुपये लुबाडल्याचा आरोप केला होता. अखिल भारतीय हिंदू महासभेने २०१५ साली विश्व हिंदू परिषदेतर्फे १४०० कोटी रुपये आणि अनेक क्विंटल सोने लुबाडले गेल्याचा आरोपही केला होता. त्याचेही उत्तर अजून संघ परिवारातर्फे दिले गेलेले नाही किंवा याची चौकशी करण्याची तयारी भाजपाच्या कोणत्याही सरकारने दाखवलेली नाही. यासंदर्भात अखिल भारतीय हिंदू महासभेने पंतप्रधान कार्यालयाकडे ४ ऑगस्ट २०१७ रोजी तक्रार केली होती.
निधी संकलन करणाऱ्या भाजपवर हिंदू महासभेचा आक्षेप
४ जानेवारी २०२१ रोजी अखिल भारतीय हिंदू महासभेने भाजपातर्फे राम मंदिर निर्मितीकरता निधी गोळा करण्याच्या कार्यक्रमाचा विरोध केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपाला अयोध्येत राम मंदिर कधीच नको होते आणि भाजपाकरता हा केवळ राजकीय आणि पैसे कमावण्याचा कार्यक्रम आहे. गेल्या तीन दशकामध्ये भाजपने जमा केलेल्या पैशाचा अजूनही हिशोब दिलेला नाही, असे हिंदू महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांनी सांगितले आहे. राम मंदिरासाठी भाजपरुपी रावण पैसे गोळा करत आहे, असे म्हणून जर हे निधी संकलन जनतेमध्ये जाहीर केले नाही तर कोर्टात जाऊ, असा इशाराही प्रमोद पंडीत जोशी यांनी दिला आहे.
निधी संकलनामध्ये अपहार
या निधी संकलनादरम्यान अपहाराच्या अनेक घटना देखील समोर आल्या आहेत, त्या चिंताजनक आहेत. १० सप्टेंबर २०२० रोजी राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टमधून ६ लाख रुपये क्लोन चेकच्या माध्यमातून काढले गेले होते. १२ एप्रिल २०२० रोजी दिल्लीच्या एका युवकावर अयोध्येतील राम मंदिर पोलिस स्टेशनमध्ये खोट्या ट्रस्टच्या नावाने खोटी वेबसाईट काढून पैसे लुबाडल्याची देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. श्रीराम मंदिर निर्माण समर्पण निधी समितीचे मुरादाबाद येथील अध्यक्षांनी खोट्या पावत्या दाखवून राम मंदिराकरता निधी गोळा करणाऱ्या ४ लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. पिलीभित येथे देखील ५ लोकांवर अशाच तऱ्हेने खोट्या संघटनेच्या माध्यमातून पैसे गोळा करण्याचा धंदा उघड झाला आहे. राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी देखील दिल्ली येथे राम मंदिर ट्रस्टच्या नावाने खोटे ट्विटर, वेबसाईट बनवल्याची तक्रार केली आहे.
भाजप, आरएसएसने गोळा केलेल्या निधीची चौकशी करावी
ऑप-इंडिया या न्यूज पोर्टलने राम जन्मभूमी तिर्थक्षेत्रच्या नावाने घोटाळा केला जात असून, अपहार करणाऱ्या १३ UPI ( United payment Interface) ची यादीच दिली असून, त्यामाध्यमातून आपल्याशी गैरव्यवहार होऊ शकतो असा इशारा देऊन काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सूरत पोलिसांनी देखील अशाच प्रकारची कारवाई १६ जानेवारीला करून एका युवकाला पैसे गोळा करताना पकडले आहे. या पार्श्वभमीवर महाराष्ट्रात भाजप आणि आरएसएसकडून मोठ्या प्रमाणात रोखीने पैसे गोळा केले जात आहे. यातून भगवान श्रीराम भाविकांची लुट होण्याची मोठी शक्यता आहे. या अनुषंगाने सदर पैसा राम मंदिराच्या निर्माण करताच निर्मीत झालेल्या ट्रस्टमध्ये जाईल याची जनतेने काळजी घ्यावी असे आवाहन सदर ट्रस्टतर्फेही करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या जनतेला लुबाडण्यात येऊ नये या कारणाने भाजपा आरएसएसने गोळा केलेला निधी त्याच ट्रस्टमध्ये पोहोचला की नाही, याची राज्य सरकारने चौकशी करावी अशी मागणीही सावंत यांनी यावेळी केली आहे.