मुंबई - मुंबईतील 1993 मधील बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला फाशी देण्यात आली (Yakub menan ). त्यानंतर याकूबच्या पार्थिवावर दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, आता याकूब मेननच्या कबरीवर एलईडी लायटिंग आणि मार्बल टाइल्स लावण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्यावरुन राज्यात राजकारण सुरू झाले आहे ((Politics of lighting on Yakub Memon grave)). एका बाजूला भाजप नेते महाविकास आघाडीवर व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असताना दुसरीकडे शिवसेनेकडून भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप हे होतच राहतील. पण, या सर्वात एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे देशद्रोहासारखा गंभीर आरोप असलेल्या एखाद्या गुन्हेगाराला जेव्हा फाशी दिली जाते त्यानंतर त्याचं काय होतं? त्याबाबत घटनेत काय तरतुदी आहेत? याचाच आढावा घेतलाय ईटीव्ही भारतने.
काय आहे याकूबचा इतिहास - याकूब मेनन हा 1993 च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी होता. 1993 ला मुंबईत विविध ठिकाणी बारा बॉम्बस्फोट करण्यात आले होते. यात तब्बल 257 जणांचा मृत्यू झाला होता तर 713 लोक जखमी झाले होते. या सर्व प्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. त्यात तब्बल 189 लोकांविरोधात दहा हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणाची पुढील तपासणी महाराष्ट्र पोलिसांकडून सीबीआयाकडे सोपवण्यात आली. त्यानंतर या बॉम्बस्फोटाचे मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन हे परदेशात फरार झाले.
टायगर फरार याकूबला अटक - मुख्य आरोपी टायगर मेनन परदेशात फरार झाल्याने टायगरच्या भावंडांना ताब्यात घेतले. यात याकूब मेनन, एसा मेनन, रुबीना मेनन आणि युसूफ मेनन या चार भावंडांचा समावेश होता. याप्रकरणी तपास यंत्रणेने याकूबला अटक केली खरी पण यापूर्वी या ग्रुपच्या नावावर कोणत्याही गुन्ह्याची नोंद नव्हती. अखेर तब्बल 11 वर्षांनी 2007 साली टाडा कोर्टाने याकूबला फाशीची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरोधात याकूबने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर 30 जुलै 2015 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या बेंचने मध्यरात्री सुनावणी घेतली आणि या ग्रुपच्या फाशीच्या शिक्षेवर अखेरची मोहोर उमटवली.
अखेर याकूब फासावर - राष्ट्रपतींच्या संमतीनंतर याकूबला नागपूरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. नागपुरात फाशी दिल्यानंतर याकूबचे पार्थिव विशेष विमानाने नागपूरहून मुंबईत आणण्यात आले. याकूबच्या घरापासून त्याची अंत्ययात्रा निघाली. दक्षिण मुंबई येथील बडा कब्रस्तान येथे त्याच्या वडिलांच्या कबरीच्या बाजूला याकूबला दफन करण्यात आले.
याकूबला घरच्यांच्या हवाली कसं केलं - आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अफजल गुरु अजमल कसाब यांना जेव्हा फाशी देण्यात आली तेव्हा यांच्यापैकी कोणाचाही पार्थिव त्यांच्या घरच्यांना किंवा इतरांच्या स्वाधीन करण्यात आले नाही मग याकूबचे पार्थिव का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आम्ही जेव्हा एडवोकेट असीम सरोदे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले की, कारागृह नियमावली व कायद्यानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीला फाशी दिली जाते तेव्हा त्या व्यक्तीचे पार्थिव त्याच्या घरच्यांना देण्याचे प्रावधान आहे. जर त्या दहशतवाद्यांच्या घरच्यांबद्दल माहिती उपलब्ध असेल तर त्याच्या नातेवाईकांना फाशी देण्यापूर्वी पूर्वकल्पना दिली जाते. फाशी दिल्यानंतर आपल्या नातेवाईकाचा मृतदेह ताब्यात घ्यावा अशा सूचना केल्या जातात. मात्र, बहुतांशवेळा त्या दहशतवादाच्या घरच्यांची माहिती उपलब्ध नसते तर काहीवेळा त्या दहशतवाद्याच्या मृतदेहावर कोणीच दावा करत नाही. अशावेळी त्या दहशतवाद्याचा मृतदेह कारागृह प्रशासन पंधरा दिवस शवागरात ठेवते. या पंधरा दिवसात या मृतदेहावर कोणीही दावा न केल्यास प्रशासनाकडून त्यावर अंत्यसंस्कार केले जातात.
बडा कब्रस्तान प्रशासन काय सांगते - या सर्व प्रकरणावर बडा कब्रस्तानचे विश्वस्त शोएब खतीब यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता या प्रकरणावर ते म्हणतात की, बडा कब्रस्तानची जागा वक्फ बोर्डाच्या अंतर्गत येते. त्यामुळे ती कोणालाही विकता येत नाही किंवा त्या जागेवर कोणीही आपला दावा सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे शब्बे बारातच्या दिवशी संपूर्ण कब्रस्तानाला आकर्षक रोषणाई केले जाते. सजवलं जातं. आता जे फोटो पसरवले जात आहेत ते त्याच वेळेचे आहेत. याकुब बद्दल आम्हाला कोणतेही सहानुभूती नाही." अशी प्रतिक्रिया बडा कब्रस्तान चा विश्वस्तांकडून देण्यात आली आहे.
ते आता भाजपला जाब विचारात आहेत - यावर आम्ही भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया घेतली असता त्या म्हणतात की, याकूब मेमन हा भारताच्या न्यायव्यवस्थेने घोषित केलेला फाशीची शिक्षा दिलेला आतंकवादी होता. याकूब मेमनसारख्या आतंकवाद्याची कबर सजवणे हा देशद्रोह आहे. यावर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे. याकूबच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या काँग्रेससोबत गळ्यात गळा घालणारे भाजपाला जाब विचारतायत. याकूबच्या सुटकेसाठी सह्यांची मोहीम राबवणाऱ्या अस्लम शेखला महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री बनवण्यात आलं.
भाजप नेत्यांचे याकूबच्या नातेवाईकांसोबत फोटो - या प्रकरणावर बोलताना शिवसेनेच्या विधानपरिषदेच्या आमदार व प्रवक्त्या मनीषा कायंदे म्हणाल्या की, मुळात याकुबला जिथे दफन करण्यात आले ते बडा कब्रस्तान एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. त्याचबरोबर आतापर्यंत आपण पाहिलं असेल लादेन, कसाब यांच्या डेडबॉड्या परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्या. मग याकुबलाच तुम्ही इतकी स्पेशल ट्रीटमेंट का दिलीत? त्याच्या अंत्ययात्रेला संपूर्ण मुंबईत जवळपास 18000 दुचाकी बाईक रॅलीसाठी रस्त्यावर होत्या. या सर्वाला परवानगी कशी मिळाली? तेव्हा गृहमंत्री तर स्वतः देवेंद्र फडणवीसच होते. इतकंच काय याकूबच्या नातेवाईकांसोबत देखील या भाजपच्या अनेक नेत्यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तर भाजपकडे आहेत का? असा प्रश्न आमदार मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे.