मुंबई - राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला (Corona Cases Hike) आहे. ३१ जानेवारीपर्यंत प्रसार कमी झाल्यास आगामी निवडणुकांचा कार्यक्रम १५ फेब्रुवारीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तसेच अनेकांनी आतापासून ऑनलाईन प्रचारावर जोर (Online Campaign) दिल्याचे दिसून येत आहे.
- तर पेच निर्माण होणार
राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावला आहे. सरकारने या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लावण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. तर दुसरीकडे कोरोनाच्या सावटाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. एकीकडे निवडणूक आयोगाने आधीच निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे कोरोनाने राज्यात सध्या 40 हजाराचा आकडा पार केला आहे. ३१ जानेवारीपर्यंत ही संख्या लाखाच्या घरात जाईल, अशी भिती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. येत्या दिवसांत रुग्णसंख्या आलेख वाढल्यास निवडणूक आयोगापुढे पेच निर्माण होऊ शकतो.
- पक्षश्रेष्ठींकडे गर्दी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत येत्या १७ जानेवारीला सुनावणी होणार आहे. निवडणुकांबाबत यानंतर निकालाचे चित्र स्पष्ट होईल. मात्र राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. नुकतीच शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप या मुख्य राजकीय पक्षाच्या कार्यकारिणीची पक्षीय स्तरावर बैठक पार पडली. कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे, असे सूर बैठकीत उमटले. पक्षाप्रमुखांकडून देखील आदेशवजा सूचना देण्यात आल्या. त्यामुळे इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे आतापासूनच भाऊ गर्दी करायला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. तर काहींजण केलेल्या कामाच्या प्रचारासाठी सोशल मीडियावर जोर दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
- ऑनलाईन प्रचारावर भर
सध्या कोरोनाची रुग्ण संख्या तीस हजाराच्या आसपास आहे. सध्या तीन दिवसांत रुग्ण उपचार घेऊन बरे होत आहेत. परंतु, झपाट्याने होणाऱ्या रुग्णवाढीमुळे कोविड सेंटर अपुरे पडू लागल्यास आगामी निवडणुकीबाबत आयोगाला गांभीर्याने विचार करावा लागेल. मात्र संख्या आटोक्यात आल्यास १५ ते २० फेब्रुवारीपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. निवडणूक आयोगाची तशी तयारी सुद्धा आहे. प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम करत असताना लोकांमध्ये जाऊन कार्यक्रम राबवावा लागतो. कोपरा बैठका, सभा, रॅली करावी लागते. तशाप्रकारची यंत्रणा कोविड काळात राबवली जात नाही. सरकारची बंधने आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ताधारी पक्ष असल्याने निर्बंध पाळणे बंधनकारक राहील. मात्र कोरोना आटोक्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यास मधल्या काळातील वेळ वाया जाऊ नये, यासाठी ऑनलाइन पद्धतीने झूम मीटिंग, प्रचार आणि सोशल माध्यमातून विविध पक्षाकडून आपापल्या योजना, धोरणं आणि निर्णय मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी भर दिला जाईल, असे वरिष्ठ पत्रकार संजय मिस्किन यांनी सांगितले.