मुंबई - मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर निवडून जाणाऱ्या दोन जागांवर शिवसेना आणि भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून गेले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी पुढील निवडणुकीत त्यांचाच महापौर होणार असल्याचे दावे केले आहेत.
मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर मुंबई महापालिकेत भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून जाणे म्हणजे भाजपचा महापौर निवडून आणण्यासाठी शुभ संकेत असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. गेली २५ वर्षे मुंबईकरांनी सत्ताधारी शिवसेनेवर सतत विश्वास दाखविला आहे. यापुढेही मुंबईकर आमच्याच पाठीशी राहतील, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. तर पुढील निवडणुकीत आमच्या पाठिंब्याशिवाय मुंबईचा महापौर बसू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडून देण्यात आली आहे.
बिनविरोध निवडणुकीचा शिवसेना आणि भाजपला असा होणार फायदा -
मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यावयाच्या दोन जागांसाठी शिवसेनेचे सुनील शिंदे, भाजपचे राजहंस सिंह यांच्याबरोबरच काँग्रेस समर्थक उमेदवार सुरेश कोपरकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता होती. मात्र, कोपरकर यांनी गुरुवारी अर्ज मागे घेतल्याने या दोघांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तिसरा उमेदवार नसल्याने निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे सुनील शिंदे व भाजपचे राजहंस सिंह यांच्या विजयाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. सुनील शिंदे हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. ते मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवकही आहेत. त्याचबरोबर सुनील शिंदे हे बेस्ट समितीचे अध्यक्षही होते. आदित्य ठाकरे यांनी विधान सभेच्या निवडणुकीसाठी वरळी मतदारसंघातून अर्ज दाखल केल्याने त्यांनी आमदारकीवर पाणी सोडले होते. मात्र, त्यांच्या त्यागाची भरपाई विधान परिषदेच्या उमेदवारीतून करण्यात आली. पुढील वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या विजयाने शिवसेनेला पालिका निवडणुकीत बळ मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपचे राजहंस सिंह यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. नगरसेवक ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. भाजपमध्ये आल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, भाजपने विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांचे पुनर्वसन केले. पुढील वर्षी म्हणजे तीन महिन्यानंततर महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय व्होटबँक भाजपकडे वळविण्यासाठी राजहंस सिंह यशस्वी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा- New Covid Variant Omicron : नवीन विषाणूत 30 पेक्षा जास्त म्युटेशन, वेगाने पसरतो - डॉ. अविनाश भोंडवे
हा भाजपसाठी शुभ संकेत -
भाजपचे नेते राजहंस सिंह यांनी मुंबई महापालिका मुख्यालयाला भेट दिली. यावेळी बोलताना राजहंस सिंह म्हणाले, की आजपासून मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसवण्याची तयारी सुरू झाली. येत्या पालिका निवडणुकीत शिवसेनेने केलेले रस्ते, गटार, रुग्णालय आदी भ्रष्टाचार प्रत्येक विभागात जाऊन नागरिकांना सांगणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. कोरोनाच्या पीपीई किटचे पैसेही शिवसेनेने खाल्याचा आरोप राजहंस सिंह यांनी केला. सत्ताधाऱ्यांचा आम्ही पर्दाफाश करू, असे सिंह म्हणाले. बाळ जन्माला आल्यापासून त्याचा मृत्युपर्यंत त्याचा पालिकेची संबंध येतो. अशा सर्व गोष्टीत पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने गेल्या २५ वर्षाच्या सत्तेच्या काळात अनेक भ्रष्टाचार केले आहेत. हे सर्व भ्रष्टाचार विभागवार, बुथमध्ये जाऊन नागरिकांच्या समोर आणून देणार आहोत. येत्या निवडणुकीत पालिकेत भाजपचा महापौर बसवू ( BJP leader Rajhans Singh on BMC election ) , असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्याचे भाजपचे पहिले पाऊल आहे. हा भाजपसाठी शुभसंकेत आहे. याचे रुपांतर येत्या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसणार यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, असे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे ( BJP leader Prabhakar Shinde on BMC election )यांनी म्हटले आहे.
हेही वाचा- Yashomati Thakur Allegations : 'सत्ता हातात घेण्यासाठी महाराष्ट्र पेटवण्याचं षडयंत्र'
मुंबईकरांचा शिवसेनेवर विश्वास -
मुंबईकरांनी गेले २५ वर्षे शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे. यामुळे पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मुंबईत शिवसेनेचा भगवा भक्कम आहे. शिवसेना हा पक्ष वेळ काळ न बघता लोकांना मदत करणारा पक्ष आहे. यामुळे कोणाला निवडून द्यायचे, हे वेळ आणि काळ ठरवेल असे मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय महापौर नाही -
मुंबई महापालिकेची पुढील निवडणूक काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेसची इतर पक्षांशी आघाडी होईल, याची शक्यता कमी आहे. मात्र, निवडणुकीनंतर आघाडी होऊ शकते. पुढील निवडणुकीत कोणत्याही पक्षाचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून येतील, याची शाश्वती नाही. त्यामुळे काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय पुढील महापौर निवडून आणणे शक्य होणार नाही. काँग्रेसचा पाठिंबा मिळणाऱ्या पक्षाचा महापौर निवडून येईल, अशी प्रतिक्रिया पालिकेतील काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्ष नेते रवी राजा ( Ravi Raja opinion on BMC Mayor election ) यांनी दिली आहे.
मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल -
शिवसेना - 97
भाजप- 81
कॉंग्रेस- 29
राष्ट्रवादी कॉंग्रेस - 8
समाजवादी पक्ष - 6
मनसे -1
एमआयएम - 2