मुंबई - गेली दहा दिवस मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सव (Ganeshotsav ) मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. मात्र आज बाप्पाला जड अंतकरणाने भावपूर्ण निरोप भक्तांकडून दिला जाणार आहे. गणेश उत्सवाच्या या दहा दिवसात मोठ्या प्रमाणात राजकीय युद्धही पाहायला मिळालं. खास करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाहेर सर्वच राजकीय पक्षांनी आपापली बॅनरबाजी (political banners)केलेली पाहायला मिळाली. मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai municipal Corporation) पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष मुंबईकरांशी जोडले जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तोच प्रत्यय विसर्जनाच्या वेळी ही दिसून येतोय.
आज विसर्जनाच्या दिवशी गिरगाव चौपाटी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी पाहायला मिळते. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासह इतरही पक्षांनी बॅनरबाजी करून महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबतचे आपले मनसुबे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. ती सत्ता मिळवण्यासाठी यावेळी भारतीय जनता पक्षाने आपली कंबर कसली आहे.
मात्र मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाने पायउतार केलं त्याचा वाचता काढण्यासाठी शिवसेनेकडून देखील बॅनरबाजी आजच्या दिवशी झालेली पाहायला मिळते. "लढायचं भिडायचं, ठासून जिरवायचं" अशी बॅनरबाजी गिरगाव परिसरात शिवसेनेकडून केलेली पाहायला मिळते.