मुंबई गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे-शिंदे (thackeray shinde group) गटात सुरु असलेल्या तणावाचं रुपांतर मारामारीत झाल्याचं दादरमध्ये पाहायला मिळालं. गणेश विसर्जन मिरवणुकीच्यावेळी प्रभादेवीत शिंदे गटाचे सरवणकर समर्थक कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. परंतु पोलिसांच्या मध्यस्थीने वेळीच संघर्ष टळला. त्यानंतर आता गोळीबार (Sada Saravankar firing case) केल्याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस तपास संपेपर्यंत सरवणकर यांची बंदूक ताब्यात घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
घटना अशी की काल प्रभादेवी परिसरात १२ ते १२. ३० च्या सुमारास दोन गटात मारामारी झाली होती. त्यानंतर गुन्हा रात्री दाखल केला होता. पुन्हा आज एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्याचा तपास सुरु आहे. आज आर्म्स ऍक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यात १० ते २० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली. सदा सरवणकर यांनी जमिनीवर गोळीबार केला असून त्यांच्यासह सहा जणांवर दादर पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केलेल्या पाच शिवसैनिकांची कोर्टाने जामिनावर मुक्तता केली आहे.
शिवसैनिकांनी दादरमध्ये समाधान आणि सदा सरवणकर यांचे पोस्टर फाडले असून त्यावर दगड देखील मारले आहेत. भादंवि कलम ३९५ हटवल्याने पाच शिवसैनिकांना जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३ आणि २५ अन्वये सदा सरवणकर यांच्यासह सहाजणांवर दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण झाले आहेत.