मुंबई - भाजप आमदार राम कदम यांना खार पोलीस ठाण्यातर्फे नोटीस देण्यात आलेली आहे. पालघर येथे झालेल्या साधू हत्याकांडाला 1 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे 16 एप्रिल रोजी भाजप आमदार राम कदम हे त्यांच्या राहता निवासस्थानावरून सिद्धिविनायक मंदिर या ठिकाणी येऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर शासनाच्या निषेधार्थ फलक घेऊन आंदोलन करणार होते. मात्र त्या अगोदरच खार पोलीस ठाणे कडून राम कदम यांना नोटीस देण्यात आलेली आहे.
188 नुसार कारवाईचा पोलिसांचा इशारा-
कोरोना महामारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात संचारबंदी व जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कलम 149 च्या अंतर्गत राम कदम यांना नोटीस देण्यात येत असून त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून असे कुठलेही कृत्य करू नये. ज्यामुळे सार्वजनिक शांततेत बाधा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवेल. राम कदम यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होत असेल तर कलम 188 नुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा पोलिसांकडून इशारा देण्यात आलेला आहे.
आमदार राम कदम यांनी पोलिसांकडून नोटीस मिळाल्याचे म्हटले आहे. नोटीस जरी मिळाली असली तरी पालघर येथील साधूंच्या हत्येच्या संदर्भात न्याय कधी मिळेल, असा प्रश्न विचारण्यासाठी शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता राम कदम हे त्यांच्या खार परिसरातील शिवराज हाईट या निवासस्थानावरून निघणार आहेत. पालघर साधू हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झाल असून अद्यापही न्याय मिळालेला नसल्यामुळे आपण सरकारला याबद्दल जाब विचारणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा- कोरोनाचा रेल्वेला फटका : प्रवासी नसल्याने राज्यांतर्गत 3 विशेष एक्स्प्रेस गाड्या रद्द