मुंबई - खारमधील एकाच कुटुंबातील ३ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींनी फेरफार करून कोरोना नसल्याचा खोटा अहवाल तयार केल्याचे उघडकीस आले. त्यांनी विमान प्रवास करण्याचा प्रयत्न केला. तिघांवरही पालिकेने खार पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे.
विमान प्रवाशांना कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच प्रवास करण्याची मुभा आहे. असे असले तरी तीन जणांनी खोटा अहवाल दाखवून विमान प्रवास करण्याचा प्रयत्न केला. सेतू अॅपमुळे हा प्रकार समोर आला आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या राज्यावरील ग्रहणाला वर्ष पूर्ण; दुसरी लाट थोपविण्याचे आव्हान
तिघांवर गुन्हा दाखल -
खार येथील एका ५३ वर्षीय पती, ५१ वर्षीय पत्नी व १५ वर्षीय मुलीला जयपूरला जायचे होते. विमान प्रवास असल्याने या तिघांनी खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी केली. या चाचणी दरम्यान या तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे तिघेही पॉझिटिव्ह असताना त्यांनी प्रवास करण्यासाठी विमानतळ गाठले. विमानतळावर या तिघांनी कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल दाखविला. विमानतळावर एअरपोर्ट यंत्रणेच्या लक्षात आल्यानंतर या तिघांनाही विमानतळावर रोखण्यात आले. केंद्र सरकारच्या आरोग्य सेतू अॅप आणि पालिकेच्या एसओपीमुळे तिघांनी खोटा अहवाल दिल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पालिकेच्या एच पश्चिम विभागाने या तिघांवर एफआयआर दाखल केला आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या काळात गर्दी टाळण्याकरता नाशकात शनिवारसह रविवारी टाळेबंदी जाहीर
अहवाल देण्यात येणाऱ्या खासगी लॅबची चौकशी करण्यात आली. तेव्हा लॅबने तीनही व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दिला असल्याचे पालिकेला समजले. अहवालामध्ये फेरफार नेमकी कुठे झाली याचा तपास पोलिसांकडून केला जात असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
काय आहे नियम ?
एखाद्या व्यक्तीला विमान प्रवास कायवयाचा असल्यास त्याला विमान उड्डाण करण्यापूर्वी ७२ तास आधी कोरोना चाचणी करावी लागते. या चाचणी दरम्यान त्याचा अहवाल निगेटिव्ह आला तरच त्या प्रवाशाला विमान प्रवास करण्याची परवानगी मिळते. ज्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह असतो अशा प्रवाशांना विमान प्रवास करण्याची परवानगी दिली जात नाही. दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा आणि केरळमधील प्रवाशांना मुंबईत येताना कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल आणावा लागतो. तसेच त्यांना विमानतळावर चाचणी करावी लागते.