मुंबई - देशभरामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत असून राज्यातील रुग्णाची संख्या 200 चा आकडा गाठत आहे. अशातच मुंबईतील असंघटित कामगार लॉकडॉऊन व संचारबंदी चालू असतानाही गावी जाण्यासाठी विविध मार्ग शोधत आहेत. साकिनाका परिसरातील 64 कामगार लोक आज पहाटे एका टेम्पो चालकास पैशाचे आमिष दाखवून उत्तरप्रदेशला घेऊन जात होते. पोलिसानी पेट्रोलिंगमध्ये त्या टेम्पोला अडवून ताब्यात घेतले असून टेम्पो चालक व मालकवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबई शहरात लॉकडॉऊन व संचारबंदी सुरू असून हाताला कोणतेही काम नाही. कोरोना संकट आणखीन वाढले तर आपले काय होणार या भीतीने भयभीत झालेल्या मुंबईतील रोजंदारी कामगार वर्ग आपले गाव जवळ करत आहेत. रेल्वे, रस्ते वाहतूक देशभर पूर्णतः बंद असून काही लोक शेकडो किलोमीटर आपल्या कुटुंबाला घेऊन चालत निघाले आहेत. राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, कोणीही मुंबई सोडू नका सर्वांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था केली जात आहे. मात्र काही लोक भीती पोटी खासगी टेम्पोने मुंबई बाहेर पडत आहेत.
आज पहाटे 3 वाजताच्या सुमारास आयशर टेम्पो (क्रमांक एम एच 02 एफ जी 1805) हा नाका-बंदी दरम्यान साकिनाका पोलिसानी आडवला. यावेळी टेम्पोमध्ये 64 लोक दाटीवाटीने बसले होते. या सर्वांची पोलिसांनी चौकशी केली असता ते सर्व रोजंदारीवर साकिनाका परिसरात काम करणारे लोक असून उत्तर प्रदेशला या टेम्पोने जात होते. टेम्पोतील लोकांनी चालक व मालक यांना प्रत्येकी 2500 रुपये रक्कम देऊ केले होते. या पैशात या सर्वांना उत्तरप्रदेशमध्ये सोडण्याचे आश्वासन चालक व मालकाने दिले होते. हा टेम्पो पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणून लोकांची विचारपूस करून त्यांना सर्व समज देऊन त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था महानगरपालिकेच्या शाळेत सर्व सुरक्षित केली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी साकिनाका पोलिसांनी टेम्पो चालक अहजद अली रजाक शहा (वय 32) व मालक मोहम्मद अली रजाक शहा (वय 35) या दोघांच्या विरोधात महाराष्ट्र साथीचे रोग प्रतिबंधक नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.