मुंबई - विधानसभा निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडण्व्यायासाठी मुंबई पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणुकी दरम्यान ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त मुंबईत असणार आहे. याशिवाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई पोलीस अधिकारी पत्रकार परिषदेत प्रणय अशोक यांनी दिली.
मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ३६ मतदार संघ येतात. यामध्ये ९ हजार ८९४ पोलिंग बूथ असून त्यामधील १५३७ बूथवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तसेच एकूण ६९ मतदान केंद्र हे संवेदनशील असून त्या ठिकाणी पोलीस विभागाकडून अतिदक्षता घेण्यात येत आहे. त्या ठिकाणी होमगार्ड आणि केंद्रीय दलाचे पोलिस कर्मचारी नेमण्यात येणार आहे. तसेच, स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना त्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे पथ संचलन
निवडणुकीसाठी मतदान 21 ऑक्टोबरला होत असून यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. यामध्ये २२ सीएपीएफ जवानांच्या तुकड्या, २७०० होमगार्ड, १२ आरपीएफ तुकड्या निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रांवर ड्रोन मार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच समाज माध्यमांवर देखील पोलिसांची नजर असणार आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी प्रणय अशोक यांनी दिली आहे.
हेही वाचा - वरळी मतदारसंघातून निवडणूक आयोगाकडून चार कोटींची संशयास्पद रक्कम जप्त
आचारसंहिता काळात १६४ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहेत. ५११ अवैद्य शस्त्र याकाळात जप्त करण्यात आलेली आहेत. तसेच दहा लाखापेक्षा अधिक रुपयांचे अवैद्य मद्य जप्त करण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात आत्तापर्यंत १० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती प्रणय अशोक यांनी दिली. पोलीस प्रशासन निवडणुकीसाठी सर्वतोपरी सज्ज आहे असा दावाही त्यांनी केला.