मुंबई- पीएमसी बँक ग्राहकांना त्यांच्या हक्काचे पैसे तेरा महिन्यानंतरही मिळाले नाहीत. याच संदर्भात पीएमसी बँकेच्या शिष्टमंडळाने आज विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मांडल्या. मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष चरण सिंग सपरा यांच्या अध्यक्षतेखाली ही चर्चा पार पडली. या बैठकीला मुख्य सचिव देखील उपस्थित होते. पीएमसी बँकेला या परिस्थितीतून बाहेर काढायला काय मार्ग आहे? याबाबत आरबीआयने सुचवावे, असे शिष्टमंडळाने सांगितले.
पीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर आरबीआयने खातेदारांना त्यांच्याच खात्यातून पैसे काढण्यासंदर्भात निर्बंध घातले आहेत. त्यामुळे खातेदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. पीएमसी बँकेतील खातेदारांना तातडीने पैसे मिळावेत, आणि त्यांना त्यांचे लॉकर हाताळता यावे. तसेच अनेक ठेवीदार हे ज्येष्ठ नागरिक असून, त्यांना दैनंदिन खर्चासाठी पैसे लागतात. मात्र गरजेला पैसे उपलब्ध नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने पटोले यांच्याकडे केली आहे.
येस बँकेच्या प्रस्तावानुसार कारवाई
यावर पंजाब व महाराष्ट्र को. ऑप बँकेच्या 9 लाख खातेदारांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्रस्ताव तयार करत कारवाई केली होती. त्यामध्ये येस बँक अडचणीत आल्यानंतर केलेल्या कारवाईचाही समावेश होता. आता याचप्रकारे प्रस्ताव तयार करण्यात यावा, असे सुचवण्यात आले. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नाना पटोले यांनी शिष्टमंडळाला सांगितले.