मुंबई : शीख समाजातील आनंद विवाह कायदा 1909 च्या ( Ananda Marriage Act 1909 in the Sikh Community ) नुसार नियम निश्चित करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त दहा राज्यांमध्ये हा कायदा लागू करण्यात आला आहे आणि त्याचे नियमही निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये दिल्ली, पंजाब, केरळ, आसाम, राजस्थान इत्यादी राज्यांचा समावेश आहे.
आनंद कारज विधीनुसार कायदेशीर मान्यता : शीख समाजातील विवाह सोहळ्यात आनंद कारज नावाचा एक विधी असतो. यानुसार त्यांच्या विवाहाची नोंदणी स्वतंत्रपणे केली जाते. मात्र महाराष्ट्रात अद्याप याची अमंलबजावणी झालेली नाही. ती न झाल्यामुळे नवविवाहित दाम्पत्यांना हिंदू विवाह कायद्यानुसारच नोंदणी करावी लागते अशी तक्रार याचिकेतून केली आहे. आनंद कारज विधीनुसार विवाह झाल्यावरच त्याला कायदेशीर मान्यता मिळू शकते. मात्र महाराष्ट्रात अद्याप हा कायदा लागू केला न जाणे दुर्दैवी आहे, अशी खंत या याचिकेत नमूद केलेली आहे.
महाराष्ट्रात अद्याप अंमलबजावणी नाही : आनंद कायदा हा साल 1909 मध्ये निर्माण झाला आहे. त्यानंतर साल 2012 मध्ये यात सुधारणा करण्यात आली आणि देशातील सर्व राज्यांना कायदा लागू करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र महाराष्ट्रात याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. या प्रकरणात याचिकादार पती-पत्नीने मागील वर्षी औरंगाबादमधील भाई दया सिंह गुरुद्वाऱ्यात विवाह केला होता. पण आनंद विवाह कायदा राज्यात लागू नसल्यामुळे त्या कायद्यानुसार नोंदणी करता आली नाही असं त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार तो लागू करावा, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
आनंद कारज म्हणजे काय ? शीख धर्मात लग्नाला आनंद कारज म्हणतात. आनंद कारजसाठी लग्न, मुहूर्त, शगुन-अशुभ, नक्षत्रांची गणना, जन्मकुंडली तयार करणे आणि जुळवणे याला विशेष महत्त्व नसतं. तर हिंदू विवाहात या सर्व गोष्टींना खूप महत्त्व आहे. देवावर श्रद्धा असणाऱ्यांसाठी आनंद कारजचे सर्व दिवस पवित्र मानले जातात. आनंद कारजमध्ये गुरुग्रंथसाहिबासमोर चार फेरे किंवा लावण करुनच शिखांचे लग्न पार पाडले जाते. तर हिंदू विवाहात सात फेरे घ्यावे लागतात. या सर्व कारणांमुळे शीख विवाह हिंदू विवाह कायद्यांतर्गत होणाऱ्या विवाहांपेक्षा वेगळे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.