मुंबई - राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात असल्याने येत्या ७ ऑक्टोबर म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून मंदिरांसह सर्वधर्मिय धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार मुंबईत मंदिरांच्या आतील भागातील क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत व कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याच्या अटीवर मंदिरे सुरु करण्यास पालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे. याबाबत नियमावली जाहीर केली असून, तसे परिपत्रक पालिकेने काढले आहे.
क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती -
राज्यात कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात आल्याने राज्य सरकारने मागील आठवड्यात येत्या ७ ऑक्टोबरपासून मंदिर आणि धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. यामुळे मागील काही महिन्यांपासून मंदिरात दर्शनासाठी जाणा-या भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी संकट कायम असल्याने परवानगी देताना कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही परवानगी देताना आपआपल्या कार्यक्षेत्रात कोरोनास्थितीचा आढावा घेऊन स्थानिक प्रशासनाने निर्णय घेण्य़ाचे अधिकार राज्य सरकारने दिले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रासाठी नियमावली जाहीर केली आहे. धार्मिक स्थळांवर एकूण क्षमतेच्या फक्त ५० टक्के उपस्थिती ठेवता येणार आहे. सॅनिटायझेशन, मास्कचा वापर आणि सोशल डिस्टनसिंग बंधनकारक राहणार आहे. धार्मिक स्थळांमध्ये भाविकांना मूर्त्यांना तसेच धार्मिक ग्रंथाना हात लावण्याची परवानगी नसेल. या नियमावलीचे पालन करणे संबंधितांना बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्या्न, आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाचा समन्स; 16 नोव्हेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
- काय आहे नियमावलीत -
- दुरूनच दर्शन, तीर्थ-प्रसाद वाटप नको
- कंटेंमेंट झोन नसलेल्या ठिकाणचीच धार्मिक स्थळे सुरू
- मास्कचा वापर, ६ फुटांचे सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझेशन बंधनकारक राहणार आहे. लक्षणे असलेल्यांनी मंदिरात जाऊ नये. मूर्ती किंवा धार्मिक प्रतिकाला हात न लावता दुरूनच दर्शन घ्यावे. गर्दी टाळावी.
- सहव्याधी असणारे, गरोदर स्त्रिया, १० वर्षांखालील मुले यांनी शक्यतो धार्मिक स्थळे आणि मंदिरात जाणे टाळून घरीच थांबावे असे आवाहन पालिकेने केले आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी. धार्मिक स्थळाच्या क्षमतेनुसार प्रवेश द्यावा, परिसरातील स्टॉल, दुकानांत सोशल डिस्टन्स पाळावा, तीर्थ प्रसाद वाटू नये.
- लोकलची प्रतिक्षाच !
कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात आल्याने टप्प्याटप्प्याने नियम शिथिल केले जात आहेत. मुंबईत १५ ऑगस्टपासून लशीचे दोन डोस घेऊन १४ दिवस झाले आहे, अशांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांसाठी लोकल कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लागली आहे. मात्र पालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारात जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार 'ब्रेक द चेन' मोहिमेअंतर्गत जुनेच नियम कायम राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सरसकट लोकल प्रवासासाठी मुंबईकरांना अजूनही प्रतिक्षाच करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा - Corona Update : राज्यात 3105 नवे रुग्ण, रिकव्हरी रेट 97.27 टक्के