मुंबई - जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून लॉकडाऊन लागल्याने सर्व व्यवहार बंद होते. जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने कंटेनमेंट क्षेत्राबाहेर जलक्रीडा, नौकानयन, पर्यटनस्थळी मनोरंजनाचे इनडोअर कार्यक्रमांस परवानगी दिली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारने प्रसिद्ध केला आहे.
मिशन बिगीन अगेन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये सूट देताना राज्य सरकारच्या महसूल वन आणि पुनर्वसन विभागाने 30 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबरला आदेश काढून मिशन बिगीनअंतर्गत सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्या आदेशाना 29 ऑक्टोबर आणि 27 नोव्हेंबरला मुदतवाढ दिलेली आहे. राज्यात आतापर्यंत कार्यालये, मंदिर, बार, रेस्टॉरेंट आदी उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. नुकतीच खेळाडूंना मैदानात सराव करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आता कंटेन्मेंट क्षेत्राबाहेर जलक्रीडा, नौकानयन, पर्यटनस्थळी मनोरंजनाचे इनडोअर कार्यक्रम यास परवानगी देण्यात आली आहे. जलक्रीडा, नौकानयनसाठी गृहविभाग (पोर्ट) गाइडलाइन आखून देईल. तसेच पर्यटनस्थळी मनोरंजनाच्या इनडोअर कार्यक्रमासाठी भारत सरकारचा पर्यटन विभाग गाइडलाइन आखून देईल. त्याचे पालन करून कार्यक्रम आयोजित करावे, असे शासन निर्णयात म्हटले आहे.
'कोविड नियमांचे पालन करा'
कंटेन्मेंट क्षेत्राबाहेर जलक्रीडा, नौकानयन, पर्यटनस्थळी मनोरंजनाच्या इनडोअर कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात येत असली तरी त्याठिकाणी कोविड 19च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे शासन निर्णयात म्हटले आहे. हा शासन निर्णय राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या सहिने 21 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.