मुंबई - मुंबईच्या फोर्ट विभागातील शहीद भगतसिंग मार्गावरील 283 अफसरा इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील काही भाग आज कोसळला. या ठिकाणाहून मुंबई अग्निशमन दलाने 20 जणांना सुखरूप बाहेर काढले. ही घटना सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली. अग्निशमन दल, पोलीस, पालिका अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य राबवले.
20 लोकांना बाहेर काढले -
फोर्ट विभागातील शहिद भगतसिंग मार्गावर 283 अफसरा इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब आज सकाळी आठच्या सुमारास कोसळला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, पालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. शिडीच्या साहाय्याने या इमारतीमधील 20 लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. या घटनेत अद्याप कोणी जखमी नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.