मुंबई - मुंबईत लसीचा साठा नसल्याने काल गुरुवारी पालिका आणि सरकारी रुग्णालयात लसीकरण बंद ठेवण्यात आले. आज शुक्रवार (दि.२ जुलै) काही केंद्रांवर दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 45 वर्षावरील नागरिकांना कोव्हीशिल्ड, तसेच कोवॅक्सिन लस देण्यात येत आहे. यानंतरचा लसीचा साठा आल्यावर पुन्हा नियमित लसीकरण केले जाईल, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
लसीचा तुटवडा
मुंबईत 16 जनेवरीपासून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण सुरू आहे. या दरम्यान, लसीचा तुटवडा भासत असल्याने लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. बुधवारी लसीचा साठा कमी होता. लसीचा साठा संपल्याने काल गुरुवारी महापालिका आणि सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. आज लसीचा साठा ज्या ठिकाणी शिल्लक आहे, अशा लसीकरण केंद्रांवर 45 वर्षावरील नागरिकांना कोव्हीशिल्ड लस देण्यात आली. तसेच, कोवॅक्सिन लस घेणाऱ्या नागरिकांसाठी दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत केवळ 3 तास लसीकरण सुरू ठेवण्यात आले. लसीचा साठा कमी असल्याने, लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, लसीचा साठा आल्यावर लसीकरण पुन्हा सुरू केले जाईल अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.
लसीकरण मोहीम
लसीकरण मोहीमेत सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच, 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. तसेच, 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरू झाले असले, तरी राज्य सरकारच्या निर्णयानुसार 30 ते 44 वयोगटातील लसीकरण केले जात आहे. तसेच, परदेशात जाणारे विद्यार्थी, कामानिमित्त परदेशात जाणारे नागरिक, ऑलम्पिकसाठी जाणारे खेळाडू यांचे लसीकरण केले जात आहे. स्तनदा माता आणि गरोदर महिलांचेही लसीकरण केले जात आहे.
30 जून पर्यंत झालेले लसीकरण
- आरोग्य कर्मचारी - 3 लाख 17 हजार 105
- फ्रंटलाईन वर्कर - 3 लाख 73 हजार 449
- ज्येष्ठ नागरिक - 14 लाख 24 हजार 396
- 45 ते 59 वय - 15 लाख 83 हजार 689
- 18 ते 44 वय - 17 लाख 27 हजार 319
- स्तनदा माता - 3 हजार 300
- परदेशी शिक्षण विद्यार्थी - 6 हजार 433
- मानसिक रुग्ण - 40
- एकूण लसीकरण - 54 लाख 35 हजार 731