मुंबई - मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरू झाला. कोरोना रुग्ण शोधण्यासाठी आणि वेळीच त्यांच्यावर उपचार करून प्रसार थांबवण्यासाठी चाचण्या केल्या जात आहेत. मार्च २०२० पासून करण्यात येत असलेल्या या वैद्यकीय चाचण्यांनी नुकताच एक कोटींचा टप्पा पार केला आहे. यानुसार २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) क्षेत्रात एकूण १ कोटी ५९ हजार २५४ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
२६० केंद्रांमध्ये चाचण्या मोफत -
मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत आहेत. याच उपाययोजनांमध्ये कोविड विषयक वैद्यकीय चाचण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. कोविड या संसर्गजन्य रोगाची बाधा झाल्याचे निदान जेवढ्या लवकर होईल, तेवढ्याच लवकर संबंधित व्यक्तीचे विलगीकरण करता येते. ज्यामुळे बाधित व्यक्तीपासून इतरांना संसर्ग होण्यास प्रतिबंध होतो. यासाठी कोविड विषयक चाचणी करून घेण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने जनजागृती करीत आहे आणि नियमितपणे चाचण्या देखील करीत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये, दवाखान्यांमध्ये आणि निर्धारित २६० केंद्रांमध्ये या चाचण्या मोफत करण्यात येत आहेत.
चाचण्या करून घ्या -
कोविड-१९ विषयक वैद्यकीय चाचण्या या कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा महत्त्वाचा भाग असल्यामुळे कोविडची लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींनी किंवा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तातडीने आपली कोविड चाचणी करवून घ्यावी. तसेच गणेशोत्सवासाठी बाहेरगावी जाऊन परतलेल्या किंवा अन्य कारणांसाठी बाहेरगावी जाऊन परत आलेल्या व्यक्तींनी आपली कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करवून घ्यावी. ज्यामुळे वेळीच निदान झाल्यामुळे वेळच्या वेळी औषध उपचार मिळण्यासह संबंधित व्यक्तीला विलगीकरणात ठेवल्यामुळे त्या व्यक्ती पासून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल. तरी या अनुषंगाने कोविड विषयक वैद्यकीय चाचणी वेळच्या वेळी करवून घेण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
हेही वाचा : State Corona Update : रुग्णसंख्येत किंचित वाढ; राज्यात ३ हजार ६०८ नवे रुग्ण, ४८ मृत्यू