मुंबई : राज्य प्रशासनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निष्ठ असलेल्या अधिकाऱ्यांकडून महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा घाट सुरू आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन त्यांचा मुकाबला करायला हवा, असे सूर काँगेस नेत्यांच्या बैठकीत मंगळवारी उमटले.
प्रशासनात संघनिष्ठ अधिकारी!
उद्योजक मुकेश अंबानी धमकी प्रकरण, मनसुख हिरेन हत्या, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हप्ता वसुलीच्या केलेल्या आरोपांमुळे राज्य सरकारची प्रतिमा मलीन झाली आहे. काँगेसच्या दिल्ली हायकमांडने याबाबत राज्यातील स्थितीविषयी अहवाल मागविला होता. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थानी काँग्रेसच्या नेत्यांची मंगळवारी बैठक झाली. फडणवीस सरकारच्या काळात संघनिष्ठ अधिकाऱ्यांच्या मोक्याच्या व महत्वाच्या ठिकाणी नेमणूक करण्यात आल्या. सरकार बदललं मात्र हे अधिकारी आजही त्याच पदावर आहेत. या अधिकाऱ्यांकडून महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा डागळण्याचे काम सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन त्यांचा मुकाबला करायला हवा. परंतु, तसे होत नाही, असे नाराजीचे सूर काँग्रेसच्या नेत्यांनी उमटवले. तर गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा घेण्यावरून काँगेसमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले. बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, अहवलाबाबत केवळ चर्चा झाल्याचे सांगितले.
हेही वाचा - मुंबई पोलीस दलात एकाच दिवशी ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या, गुन्हे शाखेतील तब्बल ६५ जणांचा समावेश