मुंबई - आठवड्याभरात राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य कोविड टास्क फोर्सने चाचण्या आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार राज्यात अखेर चाचण्या 10 हजाराने वाढल्या आहेत. मागील आठवड्यापर्यंत जिथे 50 हजारापर्यंत चाचण्या होत होत्या तिथे आता 60 हजार चाचण्या होत आहेत. पुढे यात अजून वाढ करण्यात येणार आहे अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे. चाचण्या वाढल्या असताना एक चिंतेची बाब म्हणजे आतापर्यंत झालेल्या चाचण्यापैकी 15 टक्के चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. म्हणजेच पॉझिटिव्हिटी दर 15 टक्के आहे.
आतापर्यंत 1 कोटी 56 लाख 71 हजार 282 चाचण्या -
कोरोनाची लक्षणे दिसल्याबरोबर कोरोना चाचणी करत पॉझिटिव्ह रुग्णांला शक्य तितक्या लवकर उपचार देणे आणि त्याचे विलगीकरण करत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे अत्यंत आवश्यक असते. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ही प्रक्रिया गरजेची आहे. त्यामुळे चाचण्या वाढवणे आजच्या परिस्थितीत महत्वाचे आहे. त्यामुळे विदर्भातील परिस्थिती लक्षात घेता मागील चार-पाच दिवसांपासून चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या 21 फेब्रुवारीच्या अहवालानुसार 21 फेब्रुवारी पर्यंत राज्यात 1 कोटी 56 लाख 71 हजार 282 चाचण्या झाल्या आहेत. कधी काळी अर्थात एप्रिल-मे मध्ये 20 हजार चाचण्या होत होत्या तिथे हा आकडा 50 ते 70 हजाराच्या घरात गेला होता. मात्र, डिसेंबरपासून कोरोना नियंत्रणात आल्याने चाचण्या आपोआप कमी झाल्या आहेत. मात्र, फेब्रुवारीमध्ये रुग्ण वाढू लागले आहेत. 2500 वरून आता 5 ते 7 हजार रुग दिवसाला आढळत आहेत. त्यात अमरावतीत नवा भारतीय स्ट्रेन आढळला असून तो वेगाने पसरतो आहे. त्यामुळे जितक्या चाचण्या वाढतील तितक्या लवकर रुग्णांचा शोध घेत संसर्गाची साखळी तोडता येणार आहे. या पार्श्वभूमीवर आता चाचण्या वाढवत त्या 60 हजारावर नेल्या आहेत. मागच्या आठवड्यात राज्यात 50 हजारापर्यंत चाचण्या होत होत्या.
सरकारी लॅबमध्ये 96 लाखांहुन अधिक चाचण्या -
21 फेब्रुवारी पर्यंत 1 कोटी 56 लाख 71 हजार 282 चाचण्या झाल्या आहेत. यातील 96 लाख 88 हजार 140 चाचण्या या सरकारी प्रयोगशाळा अर्थात लॅबमध्ये झाल्या आहेत. 59 लाख 83 हजार 147 चाचण्या खासगी लॅबमध्ये झाल्या आहेत. सरकारी लॅबमधील एकूण चाचण्यापैकी 84 लाख 65 हजार 335 चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. चाचण्या निगेटिव्ह येण्याचा दर 87.38 टक्के आहे. खासगी लॅबमधील 81.13 टक्के चाचण्या म्हणजेच 48 लाख 53 हजार 818 चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्याचवेळी रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा दर 15.01 असा आहे. 1 कोटी 56 लाख 71 हजार 282 पैकी 23 लाख 52 हजार 054 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यातील 12 लाख 22 हजार 805 (12.62 %) सरकारी लॅबमधील चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. खासगी लॅबमधील (18.87%) म्हणजेच 11 लाख 29 हजार 249 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. एकूणच चाचण्या जास्तीत जास्त होणे महत्वाचे असून येत्या काळात चाचण्या आणखी वाढवल्या जातील अशी शक्यता आहे.