मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेहऱ्यावर 'मास्क' लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, तरीही या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई तीव्र आणि वेगवान करण्यात आली आहे. या अंतर्गत १ ते २१ ऑक्टोबर दरम्यान ८२ हजार ४९७ नागरिकांना प्रत्येकी २०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांच्याकडून एकूण १ कोटी ६४ लाख ९६ हजार ९०० रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. कारवाई सुरू झाल्यापासून आतापर्यंतचा विचार करता एकूण ८२ टक्के कारवाई ही मागील २१ दिवसांत झाली आहे.
'कोविड – १९' च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेहऱ्यावर 'मास्क' लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. 'मास्क'चा वापर न करणाऱ्या नागरिकांवर रुपये २०० इतका दंड आकारण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः टाळेबंदी टप्प्याटप्प्याने संपुष्टात येत असताना सार्वजनिक ठिकाणी नागरिकांचा वावर वाढला आहे. प्रारंभी टाळेबंदी असल्याने स्वाभाविकच नागरिकांचा सार्वजनिक वावर अत्यंत मर्यादित होता. टाळेबंदी संपुष्टात येत असताना सुरक्षित अंतर राखण्यासह मास्कचा प्रत्येकाने आवर्जून वापर करावा, यासाठी जनजागृती देखील करण्यात आली आहे. असे असले तरी त्याचे गांभीर्य समजून न घेता मास्क वापर नियमाचे उल्लंघन करणा-या नागरिकांविरोधात प्रारंभापासूनच कारवाई करण्यात येत आहे. आता ही कारवाई अधिक तीव्र व वेगवान झाली आहे. महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये ‘विना मास्क’ संदर्भातील दंडात्मक कारवाई वेगवान करण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी ‘मास्क’चा वापर अत्यंत प्रभावी ठरत असल्याने अधिकाधिक नागरिकांनी योग्यरित्या व सातत्याने ‘मास्क’चा वापर करावा, हा कारवाईमागील उद्देश आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत असलेली विना 'मास्क' विषयक दंडात्मक कारवाई ही विभाग स्तरावर एप्रिल २०२० पासून नियमितपणे करण्यात येत आहे. दिनांक ९ एप्रिल ते २१ ऑक्टोबर २०२० दरम्यान 'मास्क' न लावता सार्वजनिक ठिकाणी आढळून आलेल्या १ लाख ७५२ नागरिकांकडून २ कोटी ३० लाख २९ हजार ४०० रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यापैकी, दिनांक १ ते २१ ऑक्टोबर २०२० या २१ दिवसांत एकूण ८२ हजार ४९७ नागरिक विना मास्क आढळले. प्रत्येकी २०० याप्रमाणे त्यांच्याकडून १ कोटी ६४ लाख ९६ हजार ९०० इतकी रक्कम दंड स्वरुपात वसूल करण्यात आली आहे. मागील २१ दिवसांत कारवाई झालेल्या नागरिकांची संख्या ही एकूण कारवाईच्या ८२ टक्के आहे. तर, दंडापोटी मागील २१ दिवसांत वसूल केलेली रक्कम ही आतापर्यंतच्या एकूण रकमेच्या सुमारे ७२ टक्के इतकी आहे.
जनजागृती व दंडात्मक कारवाई या दोन्ही बाबींमुळे सकारात्मक परिणाम साधला जाऊन व नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती होऊन आता सार्वजनिक ठिकाणी 'मास्क' वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी काही प्रमाणात कोविड – १९ संसर्गाला आळा घालण्यातही मदत होत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना आवर्जून 'फेस-मास्क' घालूनच बाहेर पडावे, ‘मास्क’चा वापर करण्यासोबतच हातांची स्वच्छता राखण्यासाठी हात वारंवार धुणे, सार्वजनिकरित्या वावरताना सुरक्षित अंतराचे पालन करणे, ही त्रिसुत्री सर्व नागरिकांनी पाळणे आवश्यक आहे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे यानिमित्ताने पुन्हा एकदा करण्यात येत आहे.