मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेईई आणि नीट या दोन्हीही परीक्षा पुढे ढकला या मागणीसाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकार विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकूणच घेत नसल्याने आज राज्यातील विद्यार्थ्यांनी जेईई आणि नीट या दोन्ही परीक्षांच्या ॲडमिट कार्डची होळी करून आपला संताप व्यक्त केला.
कोरोनाचे संकट वाढत असतानाही केंद्र सरकार जेईई आणि नीट या परीक्षा घेण्याचा अट्टहास कायम ठेवत आहे. त्यांना विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळायचे आहे काय? असा सवाल करत महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसकडून (एनएसयुआय) आज राज्यभरात केंद्राच्या भूमिकेविरोधात निदर्शने करण्यात आली. जर केंद्र सरकारने आपली भूमिका कायम ठेवली तर आम्ही परीक्षा केंद्रावर जाऊन या परीक्षा उधळून लावू, असा इशारा एनएसयुआयचे प्रदेश अध्यक्ष अमिर शेख यांनी दिला.
हेही वाचा - राज्याच्या मद्य उत्पन्नाचा प्याला अद्यापही रिकामाच...
केद्र सरकारकडून विद्यार्थ्यांचे म्हणणे समजून घेतले जात नसल्याने, आज मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये महाराष्ट्र स्टुडंट युनियनच्या विद्यार्थ्यांनी जेईई-नीट या परीक्षाच्या ॲडमिट कार्डची होळी करून आपला संताप व्यक्त केला. देशातील कोरोनाची स्थिती अद्यापही सावरलेली नसल्याने, या परीक्षा रद्द करण्याची मागणी देशभरातील विविध राजकीय पक्ष, संघटना, आणि विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते व खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनीही ही परीक्षा घेणे धोकादायक असल्याचे म्हटले होते. तर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही हीच भूमिका स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर हा सर्वाधिक असल्याने यासाठी राज्य सरकारने नुकतेच राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला तर दुसरीकडे जेईई-नीट या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरावही संमत करण्यात आला आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज एक ट्वीट करुन 'कोरोना अजून आटोक्यात आला नसल्याने जेईई-नीट या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी करण्यात येत असलेली मागणी अतिशय रास्त आहे. यामुळे केंद्र आणि सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात फेरविचार करावा' अशी विनंती केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने उद्या केंद्रातील मोदी सरकार विरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा - विरुष्काच्या घरी नव्या पाहुण्याचे होणार आगमन, पाहा काय म्हणाला विराट...