मुंबई - पुण्यातील भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज फेटाळून लावला आहे. यामुळे आता एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मात्र, एकनाथ खडसे यांना प्रकृतीच्या कारणास्तव तूर्तास दिलासा देऊन कोर्टाने पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला ठेवली आहे.
आज काय झालं न्यायालयात..?
पुणे जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंची पत्नी मंदाकिनी आरोपी असून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. या वॉरंट विरोधात मंदाकिनी खडसे मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती आणि अटक पूर्व जामिन अर्ज दाखल केला गेला होता. आज मुंबई सत्र न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. मात्र मुंबई सत्र न्यायालयाने खडसे कुटुंबीयांना कोणताही दिलासा न देता अटकपूर्व जामीन अर्जावर फेटाळून लावलेला आहे. विशेष म्हणजे आज मुंबई सत्र न्यायालयात मंदाकिनी खडसे यांची वकिलाने न्यायालयाला विनंती केली की एकनाथ खडसेंची शस्त्रक्रिया झाली असून ते सध्या बॉम्बे हॉस्पिटल मध्ये आहेत. त्यांना बरे होण्यासाठी अजूनही काही दिवस लागणार आहे. यामुळे एकनाथ खडसे कोर्टात उपस्थित राहू शकणार नाही, याकरिता आम्हाला काही अवधी द्यावा. मुंबई सत्र न्यायालयाने ही बाब लक्षात घेता, खडसे ह्याना न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी वेळ दिला गेला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला ठेवली आहे.
काय आहे प्रकरण?
एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झाल्याचं सकृतदर्शनी दिसून येत आहे. हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.
खडसेंवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार
ईडीच्या रडारवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची प्रकृती पुन्हा बिघडली असून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. न्यायालयात खडसेंच्या वकिलांनी यासंदर्भात आज माहिती दिली. दरम्यान, मूत्र मार्गाच्या संसर्गामुळे यापूर्वी खडसेंवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जुलै महिन्यात ईडीने ताब्यात घेतले. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. खडसे देखील ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे जात आहेत. आज पुणे भोसरी येथील भूखंड प्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी समन्स बजावले होते. न्यायालयात खडसे हजर राहणार होते. मात्र, खडसेंची प्रकृती अस्वस्थ असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया होत आहे, त्यासाठी ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा - एकनाथ खडसे बॉम्बे रुग्णालयात दाखल? अंजली दमानियांनी ट्विट करून साधला निशाणा