मुंबई : आत्तापर्यंत कोरोना विषाणूच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. मुंबई सारख्या गजबजलेल्या भागात या दोन्ही लाटा थोपवण्यात सरकार आणि पालिकेला यश आले. या कालावधीत रेल्वे सेवा बंद असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्टच्या बसमधून प्रवास करण्याची परवानगी होती. निर्बंध शिथिल झाल्यावर सामान्य प्रवाशांना बेस्टमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र रेल्वेमधून प्रवास करताना लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा युनिव्हर्सल पास असला तरच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
बेस्टमध्ये आज पासून अंमलबजावणी
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा ओमीक्रोन हा व्हेरियंट समोर आला. तसेच युरोपात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईच्या लोकल ट्रेन प्रमाणेच एसटी, बससेवा, टॅक्सी, रिक्षा मधून प्रवास करताना लसीचे दोन डोस घेतले असेल तरच प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या नियमांची आज पासून बेस्टच्या बसमध्ये अंमलबजावणी केली जात आहे. प्रवाशाकडे लसीचे दोन डोस घेतले असल्याचे प्रमाणपत्र किंवा युनिव्हर्सल पास तपासले जाणार आहेत. ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले नसतील त्यांना बेस्ट बसमधून प्रवासा्याची परवानगी नसेल अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे.
सरकारचे हे आहेत नियम
राज्य सरकारने ओमीक्रोन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नवी नियमावली जारी केली आहे. या नव्या नियमानुसार, मुंबईतील लोकल ट्रेनप्रमाणे एसटी, बससेवा, टॅक्सी, रिक्षा या वाहतुकीने प्रवास करायचा असेल तर दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच परवानगी देण्यात आलेली आहे. रिक्षा, टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाने मास्कचा वापर केला नसेल तर प्रवाशाला 500 रुपये आणि रिक्षा-टॅक्सी चालकालाही 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. त्याचप्रमाणे दुकानात आलेल्या ग्राहकाने मास्क घातला नसेल तर ग्राहकाला 500, तर संबंधित दुकानदाराला 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. मॉल्समध्ये ग्राहकांच्या चेहऱ्यावर मास्क नसेल तर मॉल्सच्या मालकाला तब्बल 50 हजार रुपयांचा फटका बसणार आहे.
हे ही वाचा - 'Omicron Variant'ची दहशत, टाळेबंदी नको असेल तर नियम पाळा - मुख्यमंत्री