मुंबई - मुंबईसह राज्यात गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार होता. हा प्रसार कमी झाल्याने राज्य सरकारने कोरोनावरील निर्बंध हटवले आहेत. नागरिकांना मास्क घालणे ऐच्छिक केले आहे. (The Ban On Corona Has Been Lifted) यामुळे मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर आता कारवाई होणार नाही. यासाठी मुंबई महापालिकेने उद्या 1 एप्रिलपासून मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.
दंडात्मक कार्यवाही बंद - जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सन (२०२०)च्या सुरुवातीपासून सुरु झाला होता. मुंबईतही बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार थांबवण्याठी वेळोवेळी विविध उपाययोजना केल्या आणि विविध निर्णय घेतले होते. तोंडावर मुखपट्टी अर्थात मास्क परिधान केल्याने कोरोना पासून स्वतःचा बचाव होतो. तसेच, प्रसार थांबतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) निर्देश दिल्याने सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे महानगरपालिका प्रशासनाने बंधनकारक केले होते. मास्कचा वापर न केल्यास दंड म्हणून २०० रुपये नागरिकांकडून आकारण्यात येत होते.
1 एप्रिल 2022 पासून बंद - या निर्णयाचे जे नागरिक अनुपालन करणार नाहीत त्यांच्यावर मनपा कर्मचारी, अधिकारी, मुंबई पोलीस तसेच क्लिन अप मार्शल संस्था यांच्यामार्फत 200 रुपये दंडात्मक कारवाई करून दंड वसूल केला जात होता. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार आटोक्यात येत असल्याने कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेली बंधने शिथिल करण्यात येत आहेत. बृहन्मुंबई परिसरात नागरिकानी मास्क न वापरल्यास यापूर्वी केली जात असलेली 200 रुपयांची दंडात्मक कार्यवाही आता उद्या दिनांक 1 एप्रिल 2022 पासून बंद करण्यात येत आहे.
खबरदारी म्हणून मास्क वापरा - संपूर्ण जगात कोरोनाचा धोका अजूनही पूर्णतः टळला नाही. आरोग्याची खबरदारी म्हणून नागरिकांनी कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने मास्क परिधान करावे, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा - खुषखबर..! गुढीपाडव्यापासून राज्य होणार निर्बंधमुक्त, आरोग्यमंत्र्यांची घोषणा