मुंबई - स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठीचा भूमिपूजन सोहळा मुंबईतील दादर येथील महापौर निवासस्थानी पार पडणार आहे. या स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहणार आहेत. मात्र या भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना देण्यात आलेले नाही, तसेच या भूमिपूजन सोहळ्याला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार नाहीत. यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे.
काय म्हटले आहे नितेश राणे यांनी?
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आता असते तर, त्यांनी पहिले निमंत्रण हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना दिले असते. बाळासाहेब हे राजा माणूस होते, राजा होण्यासाठी मन मोठं लागतं. मात्र आता केवळ त्यांचे किस्से उरले आहेत, मने खूप लहान झाली आहेत. असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. तसेच या कार्यक्रमाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना का बोलवण्यात आले नाही असा सवाल उपस्थित करत, ही आश्चर्याची गोष्ट असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ गणपती मंदिर दर्शनासाठी बंद