मुंबई - शिवसेना आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्यामधील वादामुळे मुंबई महापालिकेला ८२ लाख ५० हजार रुपयांचा भरुदंड सोसावा लागला आहे. सर्वसामान्य मुंबईकरांना कराच्या रूपात मुंबई महापालिकेच्या तिजोरीत जमा केलेली ही रक्कम कंगना रणौतविरोधात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईसाठी खर्च झाले आहेत. यावर भाजप नेत्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
भाजप नेते व आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे, की पेंग्विन आणि कंगना रणौतच्या प्रकरणी काम करणाऱ्या वकिलासाठी मुंबईकर कर भरतात. आणखी काय शिल्लक आहे? आता असं वाटतंय की यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील', असं ट्वीट करून नितेश राणे यांनी सरकारला टोला लगावला आहे. यावर आता शिवसेना नेते काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं गरजेचं ठरणार आहे.
कंगना वादावर महापालिकेचे ८२ लाख ५० हजार खर्च -
मुंबई महापालिकेने कंगनाचे वांद्रे येथील पाली हिल येथील कार्यालय तोडल्याचं प्रकरण न्यायालयात गेलं आहे. सुशांतप्रकरणी केलेल्या वक्तव्यानंतर कंगनाविरुद्ध शिवसेना या वादाला सुरुवात झाली. त्यानंतर पालिकेने ‘एच-पश्चिम’ विभाग कार्यालयाने पाली हिल याठिकाणी कंगना रणौतच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप करत हातोडा चालवला. यानंतर कंगनानं याप्रकरणी कोर्टात धाव घेतली आहे. याकरता पालिकेची बाजू ज्येष्ठ वकील तथा वरिष्ठ अधिवक्ता अस्पी चिनॉय मांडत आहेत. या लढ्यासाठी पालिकेने आतापर्यंत 82 लाख 50 हजार रुपये खर्च केले आहेत, हे एका माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. यावरून आता सर्वत्र पालिका शिवसेना सरकारवर इतके पैसे जनतेच्या खिशातले खर्च केले, यावरून टीका होत आहे. यावर भाजप नेत्यांनी देखील टीकेची संधी सोडलेली नाही.