मुंबई- ‘कोरोना से मत डरोना' असे म्हणत 94 वर्षाच्या आजोबांनी आज कोरोनावर विजय मिळवला आहे. कोरोनावर मात करत हे आजोबा आज कूपर रुग्णालयातून घरी परतले आहेत. कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीच्या काळात ही बाब दिलासा देणारी आहे.
कूपर रुग्णालयातून बरे होऊन घरी परतणारे 94 वर्षांचे आजोबा आतापर्यंतचे सर्वात वयस्कर रग्ण असल्याची माहिती या आजोबांवर उपचार करणाऱ्या डॉ. नीलम रेडकर यांनी दिली आहे. हे आजोबा गोरेगाव येथे राहत असून ते सैन्यात होते. त्यांना 5 जूनला सर्दी, ताप, खोकला असल्याने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची विशेष काळजी घेत त्यांच्या वर उपचार सुरू केले. आजोबा उपचाराला प्रतिसाद देत मनोबलाच्या जोरावर आठवड्याभरात बरे होऊन आज घरी गेले आहेत, असेही डॉ. रेडकर यांनी सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे हे आजोबा दोन दिवस ऑक्सिजनवर होते. पण त्यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर अखेर कोरोनावर विजय मिळवला आहे.
कूपर रुग्णालयातील सर्वात वयस्कर कोरोना योध्याला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आनंदात निरोप दिला.आजोबांनीही कोरोनाला घाबरू नका, मनोबल वाढवा, कोरोना बरा होतो. स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या, असा मोलाचा सल्ला सर्वांना दिला आहे.
सर्वत्र नवजात बाळापासून 100 वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक कोरोनाचे शिकार बनत आहेत. कोरोनामुळे जगभर जे मृत्यू होत आहेत त्यात 60 वर्षांवरील रुग्णांचेच प्रमाण सर्वाधिक आहे. या वयोगटाला कोरोनाचा धोका अधिक आहे. 60 वर्षानंतर रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. तर जोडीला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजार असतात. त्यामुळे या गटातील रुग्ण कोरोनाचे बळी ठरत आहेत. पण त्याचवेळी स्वतःच्या मनोबलावर कोरोनाला हरवणाऱ्यांचीही संख्या काही कमी नाही. अनेक वृद्ध रुग्णही बरे होऊन घरी परतत आहेत. यात या 94 वर्षांच्या आजोबांची भर पडली आहे.